दृष्टिहीनांना बळ देण्यासाठी प्रज्ञाचक्षू जिज्ञासाचे प्रयत्न
By admin | Published: July 3, 2017 02:52 AM2017-07-03T02:52:33+5:302017-07-03T02:52:33+5:30
जेमतेम १८ वर्षांची असताना अंधत्वाचा आघात तिला सहन करावा लागला. अशापरिस्थितीत कुटुंबाचा भक्कम
आत्मदीपम सोसायटीचे विविध उपक्रम : अगरबत्ती प्रकल्पाची मुहूर्तमेढ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जेमतेम १८ वर्षांची असताना अंधत्वाचा आघात तिला सहन करावा लागला. अशापरिस्थितीत कुटुंबाचा भक्कम आधार मिळाल्याने ती सावरली. मात्र यामुळे तिला आसपास असणाऱ्या शेकडो अंधांचे दु:ख कळले.
घरी दु:ख करीत बसण्यापेक्षा अशा दृष्टिहीनांना बळ देण्याचे ध्येय तिने उराशी बाळगले. या ध्येयातून आत्मदीपम सोसायटीची स्थापना करून दृष्टिहीनांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम सुरू केले. संस्थेतर्फे रविवारी सुरू करण्यात आलेला अगरबत्ती प्रकल्प याच प्रयत्नांची यशस्वी वाटचाल आहे. शेकडो अंधांना जगण्याचे बळ देणाऱ्या जिज्ञासा चवलढाल खऱ्या प्रज्ञाचक्षू ठरल्या आहेत.
आपल्या आसपास दिसणाऱ्या दृष्टिहीन लोकांप्रति प्रत्येकाला एकतर दया निर्माण होते. कधी काळी त्यांना मदतही करण्यात येते. मात्र त्यांच्यावर दया दाखविण्यापेक्षा ते स्वत:च्या भरवशावर जगण्यासाठी आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम व्हावेत, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. जिज्ञासा चवलढाल यांनी हाच दृष्टिकोन ठेवून कार्य चालविले आहे. दृष्टिहीनांना कायम रोजगार मिळावा यासाठी संस्थेमार्फत विविध उपक्रम राबविले जात असून, अगरबत्ती प्रकल्प त्याचाच एक भाग आहे.
इंटीग्रेटेड ग्रुप कंपनीचे अध्यक्ष अविनाश शिंदे यांनी दिलेल्या मोहननगर येथील जागेवर आत्मदीपम सोसायटीची इमारत उभी असून, यामध्येच हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. जिज्ञासा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाला एप्रिल महिन्यातच सुरुवात झाली. तेव्हापासून ४० निवडक लोकांना गडचिरोली येथील अगरबत्ती प्रकल्पातील तज्ज्ञांद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. गडचिरोलीचे माजी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा आणि नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी महत्त्वाचे सहकार्य केल्याचे यावेळी जिज्ञासा यांनी नमूद केले. संस्थेसाठी पर्सिस्टंट कंपनीतर्फे २० आणि डीडीआरसीतर्फे २० मशीन्स देण्यात आल्या आहेत. प्रकल्पासाठी लागणारा कच्चा माल गडचिरोलीवरून येणार आहे. अगरबत्ती विक्रेत्या सायकल ब्रॅन्ड कंपनीनेही सहकार्याचा हात पुढे करीत येथे तयार होणारा माल घेण्याची स्वीकारोक्ती दिल्याचे जिज्ञासा यांनी स्पष्ट केले. ज्यांचे शिक्षण कमी झाले आहे आणि वयानुसार सरकारी नोकरीची अपेक्षा नाही अशी अल्प अंध आणि पूर्ण अंधत्व असलेले ४० लोक यामध्ये काम करणार असून, या माध्यमातून त्यांना रोजगाराची संधी मिळणार आहे.
आत्मदीपम सोसायटीचे सेवाकार्य
जिज्ञासा यांच्या प्रयत्नातून आत्मदीपम सोसायटीची स्थापना २०१२ साली करण्यात आली. दृष्टिहीनांना शैक्षणिक प्रशिक्षणाद्वारे सक्षम बनविणे, हा या संस्थेचा महत्त्वाचा उद्देश होता. त्यानुसार त्यांच्यासाठी एमएच-सीआयटी, एमएस आॅफिस, टायपिंगच्या प्रशिक्षणाची सोय करण्यात आली. त्यामुळे अनेकांना शासकीय नोकरीची संधी मिळाल्याचे जिज्ञासा यांनी सांगितले; सोबतच कुणाचीही मदत न घेता स्वत: काम करण्याचे प्रशिक्षणही यामध्ये देण्यात येते. अंधांसाठी निर्मित कायद्याचा लाभ मिळावा म्हणून नि:शुल्क कायदेविषयक सेवाही पुरविल्या जात आहे. या माध्यमातून ९०० पेक्षा जास्त अल्पदृष्टिहीन व पूर्णदृष्टिहीन तरुण-तरुणींना प्रशिक्षण दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रेटीनॅटिस पिग्मेन्टोसाने आले अंधत्व
जिज्ञासा १८ वर्षांची असताना तिला रेटीनॅटिस पिग्मेन्टोसा हा डोळ्यांचा आजार झाल्याचे लक्षात आले. हा आजार बरा होणार नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले. त्यामुळे बीएच्या द्वितीय वर्षाला असताना तिचे शिक्षण बंद झाले. अशावेळी घरच्यांनी मात्र तिला भक्कम आधार दिला. जिज्ञासाने अ.भा. दृष्टिहीन कल्याण संघ व आनंदवनमध्ये संगणकाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तब्बल साडेतीन वर्षे आनंदवनातच प्रशिक्षक म्हणून कार्यही केले. त्यानंतर शासकीय आयटीआयमध्ये दृष्टिहीनांना संगणकाचे प्रशिक्षण देण्याचे काम केले. हा प्रकल्प बंद झाल्यामुळे त्यांनी आत्मदीपम सोसायटीची मुहूर्तमेढ रोवली आणि सेवेचे कार्य सुरू केले.