विधी संघर्षग्रस्तांना समाजाचा जबाबदार घटक बनविण्याचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 11:26 PM2018-09-08T23:26:21+5:302018-09-08T23:27:42+5:30
परिणामांची कल्पना नसल्यामुळे आणि आकस्मिक रागामुळे घडलेल्या गुन्ह्यातून आरोपी बनलेल्या विधीसंघर्षग्रस्तांना (बाल आरोपींना) पुन्हा समजाचे जबाबदार घटक बनविण्याचा प्रयत्न नागपूर पोलीस करणार आहेत. कारण गुन्हेगारीचा ठपका लागलेले हेच मुलं भविष्यात शासकीय अधिकारी, पोलीस किंवा मोठे उद्योजक घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यासाठी ‘केअर' नावाने समुपदेशन केंद्र तयार करण्यात आल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परिणामांची कल्पना नसल्यामुळे आणि आकस्मिक रागामुळे घडलेल्या गुन्ह्यातून आरोपी बनलेल्या विधीसंघर्षग्रस्तांना (बाल आरोपींना) पुन्हा समजाचे जबाबदार घटक बनविण्याचा प्रयत्न नागपूर पोलीस करणार आहेत. कारण गुन्हेगारीचा ठपका लागलेले हेच मुलं भविष्यात शासकीय अधिकारी, पोलीस किंवा मोठे उद्योजक घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यासाठी ‘केअर' नावाने समुपदेशन केंद्र तयार करण्यात आल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले.
बाल न्यायालयात ज्यांच्याविरोधात खटले सुरू अशा मुलांना शिक्षण, प्रशिक्षण, खेळ आणि समुपदेशनाची व्यवस्था केअर मध्ये आहे. महिन्यातून दोन वेळा मुलांना एकत्र बोलवून त्यांचे समुपदेशन आणि मार्गदर्शन करण्यात येईल. त्यांना शिक्षणाकडे वळवून भविष्यात जबाबदार नागरिक बनविण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील. त्याचसाठी छावणीतील पटेल बंगला, एनकॉप्स मध्ये केअर तयार करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी या केंद्राच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात डॉ. उपाध्याय बोलत होते. यावेळी बाल न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती बेदरकर आणि सहआयुक्त रवींद्र कदम उपस्थित होते.
डॉ. उपाध्याय पुढे म्हणाले, एखाद्या मुलाच्या हातून अजाणतेपणाने गुन्हा घडला तर त्याच्याकडे आरोपी म्हणून पाहणे योग्य होणार नाही. त्यासाठी कोणती परिस्थिती कारणीभूत आहे, याचा अभ्यास करावा लागेल. मुलांमध्ये गुन्हेगारीची भावना निर्माण करण्यासाठी कार्यरत कुप्रवृत्ती नष्ट करण्याची गरज आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यास त्या मुलांमध्येसुद्धा बालपण आणि सुधारण्याची चिन्ह दिसून येतील. यावेळी त्यांनी केंद्रात उपस्थितांना चांगले विचार आत्मसात करा, अभ्यास करा, शारीरिक विकासासाठी खेळाकडे वळा. तुमच्या अज्ञानाचा कुणाला गैरफायदा घेऊ देऊ नका, भविष्यातील धोके ओळखून पोलिसांना मित्र बनवा, असा सल्ला दिला. गुन्हेशाखेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी प्रस्तावना केली.
केअर (कन्सल्टिंग अॅन्ड रिफॉर्मेटिव्ह एज्युकेशन सेंटर) लोगोचे अनावरणही यावेळी पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रत्येक ठाण्यात एक स्वतंत्र अधिकारी
बालकांच्या हक्काचे संरक्षण व विधिसंघर्षग्रस्त बालकांचे पुनर्वसन हा मुख्य हेतू या केंद्राच्या निर्मितीमागे आहे. त्यासाठी पोलीस स्टेशन स्तरावर एक बाल पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी विधिसंघर्षग्रस्त बालक तसेच ज्यांना संरक्षणाची गरज आहे अशा बालकांची अद्ययावत माहिती ठेवून त्यांच्या नियमित संपर्कात राहतील. पोलीस स्टेशन स्तरावर बालकांच्या संरक्षण व काळजीबाबत योजना राबविणे, तसेच त्यांच्याविरुद्ध दाखल होणाऱ्या अपराधाबाबतचा तपास योग्य दिशेने करणे, त्याचा अहवाल बाल न्यायमंडळास पाठविणे, अशी जबाबदारी या अधिकाऱ्यावर राहणार आहे. बालकांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी या केंद्रात समुपदेशन कार्यक्रम प्रबोधनात्मक मार्गदर्शन, प्रबोधनात्मक चित्रपट दाखविणे, मोटिव्हेशनल व्याख्याने तसेच एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले जाणार आहे.
३७५ बाल आरोपींची यादी
एप्रिल २०१६ ते आॅगस्ट २०१८ पर्यंत शहरात एकूण ३७५ बाल आरोपींची यादी तयार करण्यात आली.
दोन वर्षांत ५१४ बालगुन्हेगारांची नोंद
गेल्या दोन वर्षात नागपुरात ५१४ बाल गुन्हेगारांची नोंद झाली. यापैकी ६५ बालकांनी नुकतीच वयाची १८ वर्षे पूर्ण केली. ४२ बालके वारंवार गुन्हे करणारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक ८८ बालगुन्हेगार परिमंडळ ४ मध्ये आहेत. परिमंडळ ४ मध्ये ८६, परिमंडळ १ मध्ये ८२, परिमंडळ ३ मध्ये ६० आणि परिमंडळ २ मध्ये ५९ बालगुन्हेगारांची नोंद आहे. यातील १५० वर बालगुन्हेगारांचा गंभीर गुन्ह्यात सहभाग आहे. हत्याकांडात २४ तर हत्या करण्याचा प्रयत्न करणारे १४ बालआरोपी आहेत. बलात्काराच्या गुन्ह्यात २५ अल्पवयीन आहेत, अनैसर्गिक अत्याचार करणारे ९ तर अश्लील चाळे करण्याच्या गुन्ह्यात ७ जण सहभागी आहेत. चोरीच्या गुन्ह्यात १११ तर घरफोडीच्या गुन्ह्यात ५० बालगुन्हेगार सहभागी आहेत.