तहसीलदार सावनेर यांच्यावर रेतीने भरलेला ट्रक चढविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 01:57 PM2020-01-24T13:57:10+5:302020-01-24T13:57:29+5:30
ट्रकच्या समोर गाडी आडवी करून ट्रक थांबवण्याचाही प्रयत्न केला मात्र ट्रक चालकाने तेव्हा तहसीदाराची गाडीही उडवण्याचा प्रयत्न केला.
खापरखेडा : रेतीची वाहतूक करून जाणाऱ्या ट्रकला तहसीलदाराने थांबवण्याचा प्रयत्न केला असता ट्रक ने त्यांनाच उडवण्याचा प्रयत्न करून ट्रक चालक व क्लीनर ट्रक घेऊन पसार झाले. तहसीलदार व त्यांच्या टीम ने ट्रक चा तब्बल 25 किलोमीटर पाठलाग केला. दरम्यान एकदा ट्रक थांबवण्यासाठी तहसीलदार यांच्या गाडी चालकाने ट्रकच्या समोर गाडी आडवी करून ट्रक थांबवण्याचाही प्रयत्न केला मात्र ट्रक चालकाने तेव्हा तहसीदाराची गाडीही उडवण्याचा प्रयत्न केला. शेवटी ट्रक चालक व क्लीनरला ट्रक घेऊन पसार होणे शक्य नसल्याचे लक्षात आल्याने त्यांनी गाडी गावात शिरवून रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून पसार झाले. हो घटना शुक्रवारी सकाळी 5 वाजता घडली.
सावणेरचे तहसीलदार दीपक करंडे यांच्या सोबत लिपिक जयसिंग राठोड , सुजित आडे , गणेश मोरे हे कर्मचारी जिल्हाधिकारी नागपूर यांच्या आदेशान्वये रेती चोरीवर आळा घालण्यासाठी रात्री गस्तीवर होते. पहाटे 5 वाजता मध्यप्रदेश मार्गावरील हायवे रस्त्याने नांदा गोमुख मार्गे काटोल कडे जाण्याच्या तयारीत असलेला ट्रक क्रमांक एम एच 40 बी एल 0254 क्रमांकाचा रेतीचा व्हरलोड ट्रक भरगाव वेगाने जाताना दिसला. खुद्द तहसीलदार यांनी नांदा गोमुख जवळ ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र ट्रक चालकाने ट्रक चा अधिक वेग करत तहसीलदार यांच्या वर चढवण्याचा प्रयत्न करत जवळून ट्रक नेत पसार झाले.
तहसीलदार व त्यांच्या सहकर्मीयांनी शासकीय गाडी क्रमांक एम एच 40 एफ 559 ने ट्रक चा पाठलाग केला. चालक ट्रक घेऊन कळमेश्वर ताल्युक्यातील तेलगाव कामठी कडे वळविला. दरम्यान तहसीलदारांच्या चालकाने ट्रक च्या समोर शासकीय गाडी आडवी उभी करून ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला. ट्रक चालकाने येथेही गाडीचा वेग वाढवून शासकीय गाडी उडवण्याचा प्रयत्न केला. गाडीत तहसीलदार व त्यांचे सहकामी होते ते थोडक्यात बचावले. ट्रक चालकाने गाडी तेलगाव कामठी मध्ये नेऊन रस्त्याच्या कडेला उभी करून गाडीला लॉक करून पसार झाले. तेव्हा सकाळचे सव्वा सात वाजले होते. तब्बल 25 किलोमीटर चा पाठलाग सव्वा दोन तास सुरू होता.
गाडी ताब्यात घेऊन कळमेश्वर पोलीस स्टेशन येथे 11 वाजता जमा करण्यात आला. गाडी मध्ये कसलेही कागद पत्रे नव्हती. सदर गाडीत जवळपास 8 ब्रास रेती आढळली असून ही रेती नदीच्या पत्रातून उचल करून विना रॉयल्टी नेण्यात येत असावी असा अंदाज तहसीलदार यांनी व्यक्त केला असून पोलीस स्टेशन केळवद येथे तक्रार ही त्यांनी दिलेली आहे. सदर ट्रक हा जलालखेडा येथील जलालूद्दीन मुस्तफा यांचा असल्याची माहिती आहे.