नागपुरात  भाजप कार्यालयावर कब्जा करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 11:54 PM2020-02-10T23:54:51+5:302020-02-10T23:55:09+5:30

मालमत्तेच्या हक्काच्या वादातून सोमवारी दुपारी गणेशपेठेतील भाजप कार्यालयावर एका महिलेने साथीदाराच्या मदतीने कब्जा करण्याचा प्रयत्न केला.

Attempts to occupy BJP office in Nagpur | नागपुरात  भाजप कार्यालयावर कब्जा करण्याचा प्रयत्न

नागपुरात  भाजप कार्यालयावर कब्जा करण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देमहिलेसह दोघांवर गुन्हा दाखल : टिळक पुतळा परिसरात तणाव

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : मालमत्तेच्या हक्काच्या वादातून सोमवारी दुपारी गणेशपेठेतील भाजप कार्यालयावर एका महिलेने साथीदाराच्या मदतीने कब्जा करण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात काही वेळेसाठी तणाव निर्माण झाला होता. आमदार गिरीश व्यास यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंतर मीना गुप्ता आणि राजू काळमेघ या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
टिळक पुतळ्याजवळ भाजप कार्यालय होते. ही इमारत पडल्यामुळे कार्यालय गणेशपेठेतील एका अपार्टमेंटमध्ये हलविण्यात आले. पं. दीनदयाल उपाध्याय स्मृती ट्रस्टने २०११ मध्ये टिळक पुतळ्याजवळच्या कार्यालयालगतची महादेव प्रसाद गुप्ता यांची इमारत विकत घेतली. या इमारतीच्या बहुतांश भागावर ट्रस्टचा ताबा आहे. इमारतीच्या वरच्या माळ्यावर गुप्ता यांची सून मीना गुप्ता रेस्टॉरेंट चालविते. तिने मालमत्ता दुसऱ्याला विकण्या किंवा भाड्याने देण्याच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. त्यावर न्यायालयाने स्थगनादेश दिला आहे. सोमवारी दुपारी मीना तिचा साथीदार राजू काळमेघसोबत तेथे पोहचली. तिने भाजप कार्यालयाला लावलेले कुलूप तोडून कब्जा करण्याचा प्रयत्न केला. ते माहीत पडताच मोठ्या संख्येत भाजप कार्यकर्ते तेथे पोहोचले. त्यांनी पोलिसांना कळवून मीना तसेच तिच्या साथीदाराला अटक करण्याची मागणी केली. गणेशपेठ पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी मीना, तिचा साथीदार आणि अन्य काहींना पोलीस ठाण्यात नेले. तेथे दोन्ही पक्षांची बाजू ऐकून आणि कागदपत्रे तपासल्यानंतर आ. गिरीश व्यास यांची तक्रार नोंदवून मीना गुप्ता आणि राजू काळमेघविरुद्ध जबरदस्तीने कब्जा करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.

अनेक दिवसांपासून प्रयत्न
आ. व्यास याच्या माहितीप्रमाणे मीनाने यापूर्वी मागच्या बाजूची भिंत तोडून आत शिरण्याचा आणि त्या खोलीत आपले कुलूप लावण्याचा प्रयत्न केला होता. एका खोलीत भाजपचे निवडणूक प्रचार साहित्य ठेवण्यात आले आहे. त्याचे कुलूप तोडण्याचा मीना अणि तिच्या साथीदाराने प्रयत्न केला. तेथे लाँड्री चालविणाऱ्यानेही भाजपला यापूर्वीच या दुकानांचा ताबा दिल्याचे सांगितले. भाजप नेत्यांनी सादर केलेली कागदपत्र तपासली असता त्यातून जमिनीच्या मूळ वारसदारांची सहमती असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे पोलिसांनी आता मीना आणि साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करून या प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू केली आहे.

Web Title: Attempts to occupy BJP office in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.