युनियन बँकेतील रोकड लुटण्याचा प्रयत्न
By admin | Published: May 16, 2015 02:43 AM2015-05-16T02:43:18+5:302015-05-16T02:43:18+5:30
मुख्य दारासह आतमधील कुलूप तोडून चोरट्यांनी युनियन बॅकेतील कोट्यवधींची रोकड लुटण्याचे प्रयत्न केले.
चोरटे पोहचले स्ट्राँग रूममध्ये : कोट्यवधी बचावले
नागपूर : मुख्य दारासह आतमधील कुलूप तोडून चोरट्यांनी युनियन बॅकेतील कोट्यवधींची रोकड लुटण्याचे प्रयत्न केले. मात्र, बरेच परिश्रम करूनही ‘स्ट्राँग रूम‘ तोडण्यात यश न आल्यामुळे चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. युनियन बँकेच्या सिव्हील लाईन शाखेत घडलेल्या या प्रकारामुळे संबंधितांमध्ये खळबळ निर्माण झाली.
सहायक व्यवस्थापक अमित रामराव देशमुख यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी रात्री ८ .१५ ला ते बँकेचे मुख्य प्रवेशद्वार, चॅनल गेटला कुलूप लावून घरी गेले. शुक्रवारी सकाळी ६.४५ ला पोहचलेल्या कर्मचाऱ्याने दाराची कुलूपं तुटून असल्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार बँकेचे वरिष्ठ अधिकारी शाखेत पोहचले. चोरट्यांनी स्ट्राँग रूमपर्यंत पोहचण्याची मजल मारली. त्यांनी स्ट्राँग रूममधील कोट्यवधींची रोकड काढण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश आले नाही. त्यामुळे नाईलाजाने त्यांना हात हालवत परत जावे लागले. बँकेच्या अधिकाऱ्यांनी सीताबर्डी पोलिसांना माहिती कळवली. बँकेत चोरीचा प्रयत्न झाल्याचे कळताच सेकंड पीआय चव्हाण, पीएसआय पवार आपल्या ताफ्यासह शाखेत पोहचले. चौकशीनंतर त्यांनी सहायक व्यवस्थापक देशमुख यांच्या तक्रारीवरून चोरीचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
कोट्यवधींची देवाणघेवाण, सुरक्षा रामभरोसे !
बँकेत रोज कोट्यवधींची देवाणघेवाण होत असताना सुरक्षा मात्र रामभरोसे असल्याचेच पोलिसांच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. बँकेत आठ सीसीटीव्ही आहेत. मात्र, त्यांची रेकॉर्डिंग दोन महिन्यांपासून बंद असल्यामुळे चोरटे किती होते, किती वाजता आत गेले आणि कधी बाहेर निघाले, त्याबाबत कसलीही माहिती कळू शकली नसल्याचे सीताबर्डी पोलिसांनी सांगितले. दुसरे म्हणजे, बँकेत चौकीदारही नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या अनुषंगाने सहायक व्यवस्थापक देशमुख यांच्याकडे लोकमत प्रतिनिधीने वारंवार संपर्क साधून माहिती घेण्याचे प्रयत्न केले. देशमुख यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.