बिल्डरकडून भूखंड हडपण्याचे प्रयत्न; वृद्ध कांतीबाईचा गृहमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहनाचा ईशारा

By नरेश डोंगरे | Published: January 31, 2023 12:19 AM2023-01-31T00:19:05+5:302023-01-31T00:20:11+5:30

...अखेर तिने जावयाला घेऊन प्रेस क्लब गाठले आणि पत्रकारांना आपल्यावरील अन्याय ऐकवला. मला न्याय मिळाला नाही तर मी थेट गृहमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहन करेन, असा भरल्या कंठाने ईशाराही दिला.

Attempts to grab plots from builders; Elderly Kantibai's warning of self-immolation in front of Home Minister's house | बिल्डरकडून भूखंड हडपण्याचे प्रयत्न; वृद्ध कांतीबाईचा गृहमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहनाचा ईशारा

बिल्डरकडून भूखंड हडपण्याचे प्रयत्न; वृद्ध कांतीबाईचा गृहमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहनाचा ईशारा

googlenewsNext

नागपूर: वृद्धत्वासोबतच विविध व्याधींनी तिला त्रस्त केले आहे. ना धड खाणे -पिणे ना कुणाशी तिचे हसणे बोलणे. परिणामी ती तशीही खचली आहे. अशात तिच्या निराधारपणाचा फायदा उठवत एका त्रिकुटाने तिच्या मालकीच्या भूखंडाला गिळंकृत करण्याचे प्रयत्न चालविले आहे. अजनीचे पोलीस तिची साथ देण्याऐवजी भूखंड बळकावणाऱ्या बिल्डरला साथ देत आहेत. पोलीस तिची व्यथा ऐकायला तयार नसल्याने ७६ वर्षीय कांता उर्फ कांतीबाई कुरवंशी अक्षरश: रडकुंडीला आली आहे. काय करावे, कसे करावे ते कळेनासे झाल्याने अखेर तिने जावयाला घेऊन प्रेस क्लब गाठले आणि पत्रकारांना आपल्यावरील अन्याय ऐकवला. मला न्याय मिळाला नाही तर मी थेट गृहमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहन करेन, असा भरल्या कंठाने ईशाराही दिला.

अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माैजा बाबुळखेडा परिसरात कांतीबाई यांचे पती छंगुराम कुरवंशी यांनी २ आणि ८ क्रमांकाचे दोन (एकूण ३ हजार फुट) भूखंड १९७४ मध्ये विकत घेतले होते. जमिनमालक बोरकर यांच्याकडून रितसर विक्री अन् कब्जापत्र घेतल्यानंतर कुरवंशी दाम्पत्याने तेथे एक झोपडेवजा घर बांधले. बाजुला ताराचे कुंपनही घातले. त्यावेळी ते पांढराबोडी, रामनगरमध्ये राहत होते. त्यामुळे अधूनमधून आपल्या भूखंडावर यायचे. २००३ मध्ये छंगुराम यांचे निधन झाले अन् कांतीबाई एकाकी पडल्या. वृद्धत्व अन् एकाकीपणामुळे त्यांनाही नंतर अनेक व्याधीने घेरले. 

रामेश्वरीत राहणारी त्यांची मुलगी आणि जावई गणेश लोणारे यांनी तिला आधार दिला. त्यामुळे त्यांची कशीबशी खाण्यापिण्याची व्यवस्था होऊ लागली. मात्र, या भूखंडाकडे अन् तेथील झोपडेवजा घराकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. ही संधी साधून काहींनी त्यांचा भूखंड हडपण्याचे षडयंत्र रचले. लोखंडी अँगलने त्या भूखंडावर कब्जा करण्याचा प्रयत्न चालविला. ते कळाल्याने १० डिसेंबर २०२२ ला वृद्ध कांतीबाई त्यांच्या नातलगांना आणि मजुरांना घेऊन बासबल्ल्यांसह तेथे पोहचल्या. यावेळी तेथे बिल्डर अनिल खानोरकर, नीलेश खांडे आणि मनोज एनपेडीवार आपल्या साथीदारांसह पोहचले आणि त्यांनी तो भूखंड आपला असल्याचे सांगून त्यांनी कांतीबाईला तेथून हुसकावण्याचे प्रयत्न केले. तणाव निर्माण झाल्याने प्रकरण अजनी पोलीस ठाण्यात गेले. 

पोलिसांनी दोन्हीकडच्या मंडळींची कागदपत्रे तपासली. कांतीबाईचे१९७४ चे विक्रीपत्र, आरएल, सिटी सर्व्हे मोजणी, कॉर्पोरेशन टॅक्स बघितले. हा भूखंड वृद्ध कांतीबाईंच्याच मालकीचा असल्याचे लक्षात येऊनही अजनी पोलिसांनी अतिक्रमणाचा प्रयत्न करणाऱ्या उपरोक्त तिघांवर कारवाई न करता दोघांनाही १४९ ची नोटीस देऊन 'आहे ती स्थिती राहू द्या' असे सांगितले. डावपेच माहित नसलेल्या कांतीबाई आणि त्यांचे नातेवाईक आश्वस्त होऊन घरी परतले. ईकडे गैरअर्जदारांनी या भूखंडावर कब्जा करण्यासाठी टिनाचे कंपाउंड ठोकले. कांतीबाईंना त्यांच्याच भूखंडावर येण्यास मज्जाव करून धमक्या दिल्या जात आहे. 

या संबंधाने वारंवार तक्रारी करूनही अजनी पोलीस कांतीबाई आणि नातेवाईकांना शांत राहण्याचा सल्ला देऊन गैरअर्जदारांची मदत करीत आहेत. हे कटकारस्थान लक्षात आल्याने कांतीबाईने पोलीस उपायुक्तांकडेही तक्रार केली मात्र फायदा झाला नाही. त्यामुळे अखेर त्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा मांडत न्यायाची अपेक्षा केली आहे. आपला भूखंड आपल्याला मिळावा आणि तो हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या गैरअर्जदारांवर कडक कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे. तसे झाले नाही तर आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करेन, असा ईशाराही त्यांनी आज दिला आहे.

भूमाफियांची वळवळ पुन्हा सुरू -
वृद्ध, असहाय परिवाराच्या जमिनी शोधून त्यांची बनावट कागदपत्रे तयार करायची अन् ते भूखंड किंवा जमिनी हडपायच्या, असा गोरखधंदा करणाऱ्या अनेक टोळ्या नागपुरात कार्यरत आहेत. त्यांना काही वादग्रस्त बिल्डरांचे पाठबळ आहे. 'डी गँग' म्हणून त्यांच्यातील काही पोलिसांच्या रेकॉर्डवरही आहेत. मध्यंतरी शहर पोलिसांनी या टोळ्यांवर कडक कारवाई केली. त्यामुळे त्या गप्प बसल्या. आता मात्र, त्या परत वळवळ करीत असल्याचे काही प्रकरणातून उजेडात येत आहे.

Web Title: Attempts to grab plots from builders; Elderly Kantibai's warning of self-immolation in front of Home Minister's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.