"देशात कट्टरतावादाला चिथावणी देणाऱ्या घटनांमध्ये अचानक वाढ"; सरसंघचालकांनी व्यक्त केली चिंता

By योगेश पांडे | Published: October 12, 2024 10:02 AM2024-10-12T10:02:30+5:302024-10-12T10:07:07+5:30

भारतात सर्वत्र मूल्यांचा ऱ्हास आणि भेदभाव करणाऱ्या घटकांच्या समाज तोडण्याच्या खेळी दिसत असल्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं.

Attempts to spread chaos in the country in the name of casteism Sarsanghchalak Mohan Bhagwat on the occasion of Vijayadashami celebration of RSS | "देशात कट्टरतावादाला चिथावणी देणाऱ्या घटनांमध्ये अचानक वाढ"; सरसंघचालकांनी व्यक्त केली चिंता

"देशात कट्टरतावादाला चिथावणी देणाऱ्या घटनांमध्ये अचानक वाढ"; सरसंघचालकांनी व्यक्त केली चिंता

नागपूरराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शनिवारी ९९ वर्ष पूर्ण झाले व संघाने शताब्दी वर्षात पदार्पण केले. रेशीमबाग येथे शनिवारी विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे नागपुरात पाऊस असूनदेखील चिखल व पावसात हे आयोजन झाले. यावेळी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी देशात जातीपातीच्या आधारावर निर्माण होत असलेले भेद व त्यामाध्यमातून अराजकता पसरविण्याच्या प्रयत्नांवर चिंता व्यक्त केली.

या कार्यक्रमाला इस्त्रोचे माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आज भारतात सर्वत्र मूल्यांचा ऱ्हास आणि भेदभाव करणाऱ्या घटकांच्या समाज तोडण्याच्या खेळी दिसत आहेत. जात, भाषा, प्रदेश इत्यादी छोट्या वैशिष्ट्यांच्या आधारे सामान्य समाजाला वेगळे करून संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे आज देशाच्या वायव्य सीमेला लागून असलेल्या पंजाब, जम्मू-काश्मीर, लडाख; सागरी सीमाक्षेत्रातील केरळ, तामिळनाडू आणि बिहारपासून मणिपूरपर्यंत संपूर्ण पूर्वांचल अस्वस्थ आहे. देशात विनाकारण कट्टरतावादाला चिथावणी देणाऱ्या घटनांमध्येही अचानक वाढ होताना दिसते आहे. परिस्थिती किंवा धोरणांबद्दल असंतोष असू शकतो, परंतु ते व्यक्त करण्याचे आणि विरोध करण्याचे लोकशाही मार्ग आहेत. त्यांचे पालन न करता हिंसाचार करणे, समाजातील एखाद्या विशिष्ट वर्गावर हल्ला करणे, विनाकारण हिंसाचार करणे, भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, ही गुंडगिरी आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अशा वागण्याला 'अराजकतेचे असे म्हटले आहे, याकडे सरसंघचालकांनी लक्ष वेधले. यावेळी स्वयंसेवकांनी विविध शारीरिक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. 

असत्याच्या आधारावर देशाची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न

देशाने कोट्यवधी जनतेच्या आशा आकांक्षांच्या पुर्ततेसाठी गती पकडली आहे. मागील काही वर्षांमध्ये जगात भारताचा दबदबा वाढला आहे व एक सशक्त देश म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे. तरुणाईमध्ये स्व ची भावना वाढीस लागली आहे. देशात तरुण, महिला, उद्योजक, शेतकरी, कामगार, जवान, प्रशासन इत्यादी क्षेत्रांत मौलिक कार्य झाले आहेत. मात्र काही तत्त्व षडयंत्र रचून यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाच्या चारही बाजुंना अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  देशाची प्रतिमा मलिन करण्यासाठी जाणुनबुजून षडयंत्र रचण्यात आले आहे. असत्य किंवा अर्धसत्याच्या आधारावर लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बांगलादेशमधील स्थिती गंभीर, दुर्बल राहणे हा अपराधच

बांगलादेशमधील हिंदू समाजावर झालेले हल्ले हा गंभीर प्रकार होता. तेथील हिंदू समाज एकत्रितपणे समोर आला म्हणून काही प्रमाणात त्यांचा बचाव झाला. मात्र जोपर्यंत तेथील अत्याचारी कट्टरपंथीय लोक सक्रिय आहेत तोपर्यंत हिंदूंसोबत अल्पसंख्यांक समाजावर सातत्याने धोक्याची तलवार लटकत राहणार आहे. भारत सरकारने तेथील हिंदूंच्या मदतीसाठी सातत्याने पुढाकार घ्यायला हवा. तेथे भारताचा सामना करण्यासाठी पाकिस्तानसोबत हातमिळावणी करण्याच्या गोष्टी होत आहेत. जगातील काही देश हे प्रयत्न करत आहेत. यावर शासनाने लक्ष दिले पाहिजे. भारतातदेखील अवैध घुसखोरी सुरू असून त्यामुळे लोकसंख्येचे असुंतलन निर्माण होत  असून ही गंभीर बाब आहे. दुर्बल राहणे हा अपराध आहे. त्यामुळे हिंदू समाजाने संघटित होत सशक्त होणे ही काळाची गरज आहे, असे डॉ.भागवत म्हणाले.

देशहितापेक्षा स्वार्थाच्या राजकारणामुळे नुकसान

देशातील विविधतेला तोडण्याचे व फुटीरवाद तसेच असंतोष निर्माण करत अराजकता निर्माण करण्याचेदेखील प्रयत्न सुरू आहेत. काही घटकांच्या असंतोषाला हवा देऊन तो घटक समाजापासून वेगळा आणि व्यवस्थेविरुद्ध आक्रमक बनवला जात आहे. त्यानंतर व्यवस्था, कायदा, शासन, प्रशासन इत्यादींबद्दल अविश्वास आणि द्वेष वाढवून अराजकता आणि भीतीचे वातावरण निर्माण करण्यात येत आहे. काही लोक यासाठी राजकारणाचा उपयोग करत आहेत. देशहितापेक्षा स्वार्थाच्या राजकारणाला जास्त प्राधान्य देण्यात येत आहे. पर्यायी राजकारणाच्या नावाने आपली विनाशकारी कार्यसूची पुढे नेणे ही त्यांची कार्यपद्धती आहे. अनेक देशांमध्ये असे प्रकार घडले आहेत. भारतातदेखील सीमेवरील भाग तसेच आदिवासी लोकसंख्या असलेल्या भागात असे प्रकार जास्त दिसून येत आहेत. 'डीप स्टेट', 'वोकिज़म', 'कल्चरल मार्क्सिस्ट' असे शब्द सध्या चर्चेत आहेत. किंबहुना हे सर्वच सांस्कृतिक परंपरांचे घोषित शत्रू आहेत, असे देखील सरसंघचालक म्हणाले.

मुलांच्या मोबाईलच्या वापरावर लक्ष ठेवा

आजच्या युगात लहान मुलांच्या हातातही मोबाईल पोहोचला आहे. मात्र मुले काय पाहत आहेत याकडे पालकांचे लक्ष नसते. त्यातून अनेकदा सभ्यतेचे उल्लंघन होते व विकृती वाढते. त्यामुळे मोबाईलच्या वापरावर लक्ष ठेवायला हवे, असे सरसंघचालकांनी प्रतिपादन केले.

पश्चिम बंगाल सरकारवर टीकास्त्र

यावेळी सरसंघचालकांनी पश्चिम बंगालमधील अत्याचाराच्या घटनेवर भाष्य सेले. कोलकात्याच्या आर.जी. कार हॉस्पिटलमध्ये घडलेली घटना ही संपूर्ण समाजाला कलंकित करणाऱ्या अशा घटनांपैकी एक आहे. अशा निंदनीय घटनेचा निषेध आणि त्वरित, संवेदनशील कारवाई करावी या मागणीसाठी संपूर्ण समाज वैद्यकीय क्षेत्रातील बांधवांच्या पाठीशी उभा राहिला. पण एवढा भीषम गुन्हा घडल्यानंतरही गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठी काही लोकांकडून जे घृणास्पद प्रयत्न केले गेले त्यातून गुन्हेगारी, राजकारण आणि दुष्कृती यांची सांगड आपल्याला कशी बिघडवत आहे, हेच दिसून येते, या शब्दांत त्यांनी पश्चिम बंगाल सरकारवर अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडले.

गडकरी, फडणवीस संघ गणवेशात

विजयादशमीच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संघाच्या गणवेशात उपस्थित होते. याशिवाय राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील उपस्थित होते.
 

Web Title: Attempts to spread chaos in the country in the name of casteism Sarsanghchalak Mohan Bhagwat on the occasion of Vijayadashami celebration of RSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.