१० वर्षांचा क्राईम रेकॉर्ड अपडेट करण्याचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 11:22 PM2019-08-26T23:22:08+5:302019-08-26T23:23:58+5:30
१० वर्षांतील गुन्हेगारीचा अहवाल बनविण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्त निर्मलादेवी एस. यांनी आज पत्रकारांना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परिमंडळ चारमधील हत्या आणि हत्येचे प्रयत्न करणा-या घातक गुन्हेगारांवर यापुढे सलग नजर ठेवली जाईल. सराईत गुन्हेगारांची नवी यादी तयार करून त्यांच्या १० वर्षांतील गुन्हेगारीचा अहवाल बनविण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्त निर्मलादेवी एस. यांनी आज पत्रकारांना दिली.
परिमंडळ चारचे उपायुक्त राजतिलक रौशन यांची उस्मानाबादला पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी रौशन यांच्या रिक्त पदावर निर्मलादेवी यांची नियुक्ती केली. विशेष म्हणजे, निर्मलादेवी चार वर्षांपूर्वी नागपुरात उपायुक्त म्हणून सेवारत होत्या. त्यावेळी त्यांनी परिमंडळ तीनच्या उपायुक्त, विशेष शाखा आणि मुख्यालय उपायुक्त म्हणूनही काही दिवस जबाबदारी सांभाळली होती. येथून त्या मुंबईला बदलून गेल्या आणि पुन्हा सहा महिन्यांपूर्वी नागपुरात उपायुक्त म्हणून बदलून आल्या. अशा प्रकारे नागपुरात एकाच पदावर दुस-यांदा बदलून आलेल्या निर्मलादेवी पहिल्या पोलीस उपायुक्त ठरल्या आहेत. आतापावेतो त्यांच्याकडे विशेष शाखेच्या उपायुक्त म्हणून जबाबदारी होती. आज त्यांना परिमंडळ चारच्या उपायुक्त म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. उपायुक्त निर्मलादेवी यांनी पदाची सूत्रे स्विकारल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन नंदनवनमधील दोन हत्येच्या प्रकरणाची माहिती पत्रकारांना दिली. या प्रकरणात आतापर्यंत काय घडामोडी झाल्या, ते सांगून एका हत्याकांडातील मुख्य आरोपी शेंडी उर्फ राहुल अण्णाजी पुल्लीवार (सेनापतिनगर) फरार असल्याचे सांगितले. त्याला शोधण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.
रेती तस्कर अन् भूमाफियांकडे लक्ष
लोकमतशी बोलताना त्यांनी परिमंडळ चारमधील गुन्हेगारीचा आढावा घेतला. या भागात अनेक कुख्यात गुन्हेगार आहेत अन् त्यांची गुन्हेगारीची पद्धत कशी आहे, ते स्पष्ट करून त्यांनी नंदनवनमधील रेती तस्करी तसेच हुडकेश्वर, बेसा-बेलतरोडी भागातील कोट्यवधींच्या जमिनींची झटपट निस्तरली जाणारी प्रकरणे, भूमाफियांच्या विषयानेही चर्चा केली. या सर्व गैरप्रकारावर विशेष लक्ष पुरविले जाईल. त्यावर अंकूश बसविण्यात येईल आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही निर्मलादेवी यांनी स्पष्ट केले.