पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थितीचा मान 'वंदे भारत'च्या सहायक लोको पायलटला
By नरेश डोंगरे | Published: June 8, 2024 10:02 PM2024-06-08T22:02:59+5:302024-06-08T22:13:59+5:30
गोंदियाच्या स्नेहसिंग बघेल यांना विशेष निमंत्रण, दपूम रेल्वेत आनंदीआनंद
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे विशेष निमंत्रण सहायक लोको पायलट स्नेहसिंह बघेल यांना मिळाले आहे. या सन्मानामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत आज आनंदोत्सव साजरा केला गेला.
गोंदिया येथील रहिवासी असलेले बघेल दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत कार्यरत असून, नागपूर बिलासपूर मार्गावर धावणाऱ्या वंदे भारतमध्ये ते सेवारत आहेत. भारताची एक आलिशान आणि हायस्पिड ट्रेन मानल्या जाणारी वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांना कनेक्ट करते. ११ डिसेंबर २०२२ ला नागपूर स्थानकावरून या गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला होता.
त्यावेळीच्या शुभारंभाच्या स्पेशल फेरीत चालक दलात बघेल होते. त्यांची हीच कनेक्टिव्हीटी त्यांना आता रविवारी दिल्लीत होणाऱ्या पंतप्रधानांच्या खास शपथविधी सोहळ्याचे साक्षिदार बणण्याची संधी देणारी ठरली. आज दपूम रेल्वेच्या शिर्षस्थ अधिकाऱ्यांमार्फत बघेल यांना हे निमंत्रण मिळाले. त्यानंतर वंदे भारत तसेच दपूम रेल्वेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाला उधाण आले.