अटेन्डंटचे काम नातेवाईकांवर
By admin | Published: June 20, 2017 01:59 AM2017-06-20T01:59:29+5:302017-06-20T01:59:29+5:30
रुग्णाला तातडीने अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया गृहात किंवा सिटीस्कॅनपासून ते एमआरआय कक्षात पोहचविण्यासाठी अटेन्डंटची कामगिरी मोलाची ठरते.
मेडिकलमधील प्रकार : स्ट्रेचर, व्हीलचेअर व ओढावे लागते आॅक्सिजन सिलिंडर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रुग्णाला तातडीने अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया गृहात किंवा सिटीस्कॅनपासून ते एमआरआय कक्षात पोहचविण्यासाठी अटेन्डंटची कामगिरी मोलाची ठरते. मात्र, मध्य भारतातील सर्वात मोठ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) अटेन्डंटची तब्बल २८० पदे रिक्त आहेत. जे आहेत त्यातील फार कमी जण जागेवर उपलब्ध राहत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांवर स्ट्रेचर, व्हीलचेअर, आॅक्सिजन सिलिंडर ओढावे लागते. ही बिकट वेळ निभावून नेताना दमछाक होते.
मेडिकलमधील अल्प मनुष्यबळाचा फटका रुग्णालय प्रशासनासोबतच रुग्णांना बसत आहे. पूर्वी मेडिकलमध्ये २६ वॉर्ड होते. रुग्णांची संख्या मर्यादित होती. विभागही फार कमी होते. त्यावेळी वॉर्ड व रुग्णसंख्या गृहित धरून अटेन्डंटची ६०० पदे मंजूर करण्यात आली होती. सध्या वॉर्डाची संख्या ४६ झाली आहे, तर खाटांची संख्या १४००वर गेली आहे. विविध विभागातही वाढ झाली आहेत. परंतु गेल्या ६३ वर्षांत अटेन्डंटच्या पदात वाढ करण्यात आली तर नाहीच जुनी रिक्तपदेही भरण्यात आलेली नाहीत. सध्याच्या स्थितीत मेडिकलमध्ये अटेन्डंटची केवळ ३२० पदे भरली असून २८० पदे रिक्त आहेत. वॉर्डासह, बाह्यरुग्ण विभाग, अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया गृहातही ड्युटी लावली जात असल्याने वॉर्डात तीन शिफ्टमध्ये अटेन्डंट ठेवणेही रुग्णालय प्रशासनाला अडचणीचे जात आहे. यातच ६० टक्के अटेन्डंटचे वय ५०वर आहे. त्यांच्याकडून धावपळीची कामे होत नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनाच आलेली वेळ निभावून न्यावी लागत आहे.
पदे भरण्याकडे दुर्लक्ष
मेडिकलमध्ये अटेन्डंट व सफाई कर्मचाऱ्यांची संख्या अल्प आहे. गेल्या वर्षी निविदा काढून ही पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु त्यांच्या वेतनाला घेऊन शासनस्तरावर निर्णयच झाला नाही. यामुळे ही प्रक्रिया थंबडबस्त्यात पडली. मेडिकल प्रशासन या संदर्भात वारंवार शासनाकडे प्रस्ताव पाठवित असले तरी कोणीच याबाबत गंभीर नसल्याचे चित्र आहे.
कधी थांबणार ही दमछाक?
दुसऱ्या मजल्यावरील मेडिसीनच्या वॉर्डात भरती असलेल्या एका वृद्ध महिलेला सोनोग्राफी करण्यासाठी तळमजल्यावर पाठविले. परंतु सोबत अटेन्डंट दिला नाही. नातेवाईकांनी व्हिलचेअरवर बसवून दुसऱ्या मजल्यावरून कसेतरी खाली उतरविले, परंतु चढविताना चांगलीच दमछाक करावी लागली. दोन-तीन वेळा वृद्ध महिला व्हिलचेअरवरून पडताना वाचल्या. प्रसूती वॉर्डातील एका रुग्णाच्या नातेवाईक महिलेने सांगितले, अटेन्डंटची सर्वाधिक कामे आम्हालाच करावी लागतात. वॉर्डाची केवळ सकाळीच सफाई होते. यामुळे सायंकाळपर्यंत शौचालयातून घाण वास येणे सुरू होते. यामुळे शौचालयापासून जवळ असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकाला त्याच्या सफाईकडे लक्ष द्यावे लागते. शल्यक्रिया विभागाच्या वॉर्डात तर रुग्णांच्या नातेवाईकांना ड्रममध्ये पाणी भरण्याचे काम सोपविले जाते, अशी स्थिती आहे.