शिवणगावातील प्रकल्पग्रस्तांचे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे लक्ष
By admin | Published: March 20, 2016 03:16 AM2016-03-20T03:16:33+5:302016-03-20T03:16:33+5:30
मिहान-सेझचा विकास करणारी शासनाची कंपनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) मिहानमधील कार्यालय ...
२७ मार्चला बैठक, विश्वास पाटील यांच्याशी चर्चा : वाढीव मोबदला व १२.५ टक्के जमीन द्या
नागपूर : मिहान-सेझचा विकास करणारी शासनाची कंपनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) मिहानमधील कार्यालय दोन दिवस ताब्यात घेऊन ठिय्या आंदोलन करणाऱ्या शिवणगावातील प्रकल्प्रगस्तांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चेसाठी तयार झाले आहेत. २७ मार्चला होणाऱ्या चर्चेतून काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रकल्प्रगस्तांच्या ठिय्या आंदोलनापुढे नमते घेत मुख्यमंत्री व एमएडीसीचे अध्यक्ष फडणवीस आणि उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील चर्चेसाठी तयार झाले. त्यानुसार शनिवार, १९ ला दुपारी २.३० वाजता पाटील यांनी तब्बल दोन तास विविध मागण्यांवर प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. त्यांच्यानुसार मुख्यमंत्री २७ मार्चला प्रकल्प्रगस्तांची चर्चा करणार आहेत.
मोबदला व विकास शुल्काविना १२.५ विकसित जमिनीची मागणी
शिवणगावातील शेतकऱ्यांना लगतच्या जयताळा गावाप्रमाणेच एकरी ६० लाख रुपये मोबदला आणि कोणतेही विकास शुल्क न आकारता १२.५ टक्के विकसित जमीन देण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली.
वाढीव मोबदल्यासाठी कोर्टात गेल्यानंतर तब्बल २२ वर्षे लागतात. त्यामुळे हा प्रश्न लोकअदालतमध्ये सोडवावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली. हा प्रश्न विश्वास पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलला. २७ मार्चच्या बैठकीत ते निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.
घरांच्या पुनर्वसनासाठी संयुक्त समिती
शेतकरी, बिगर शेतकरी आणि अतिक्रमण अशी वर्गवारी करून शासन शिवणगावातील जवळपास ११६० रहिवाशांना चिचभुवन येथे अनुक्रमे तीन हजार, दीड हजार आणि हजार चौरस फूट विकसित प्लॉट देणार आहे. याशिवाय गजराज ६२ प्रकल्पग्रस्तांना शेतकरी वर्गवारीत ३ हजार चौ.फूट प्लॉट मिळेल. (प्रतिनिधी)