हलबा समाजाने वेधले शासनाचे लक्ष
By admin | Published: March 7, 2017 02:13 AM2017-03-07T02:13:52+5:302017-03-07T02:13:52+5:30
हलबा समाजबांधवांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हलबा सेना समितीच्या नेतृत्वात रविवारी मोर्चा काढण्यात आला.
मोर्चा : गडकरी यांना एक लाख स्वाक्षऱ्यांचे निवेदन
नागपूर : हलबा समाजबांधवांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हलबा सेना समितीच्या नेतृत्वात रविवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर समितीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांना एक लाख स्वाक्षऱ्यांचे निवेदन सादर केले.
हलबा सेना समितीचे प्रा. अभयकुमार धकाते यांच्या नेतृत्वात गोळीबार चौक येथून हलबा क्रांती मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी मोर्चाला चिटणीस पार्क चौकात रोखले.
यामुळे मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मोर्चेकऱ्यांनी गडकरी वाड्यावर जाऊन निवेदन देण्याचा आग्रह लावून धरला. पोलिसांनी अखेर यातून मधला मार्ग काढत पाच लोकांच्या शिष्टमंडळाला निवेदन घेऊन जाण्यास परवानगी दिली. प्रा अभयकुमार धकाते यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने वाड्यावर जाऊन गडकरी यांना निवेदन सादर केले. यावेळी गडकरी यांनी शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारीत मागण्यांबाबत तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)