दीक्षाभूमीवर मोदींची ध्यान साधना
By Admin | Published: April 15, 2017 02:03 AM2017-04-15T02:03:25+5:302017-04-15T02:03:25+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमीला भेट दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धांना अभिवादन : परिसराची केली पाहणी
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी त्यांनी मध्यवर्ती स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पवित्र अस्थिकलश आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशासमोर पाच मिनिटे त्यांनी ध्यान साधना केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सकाळी ११.०५ मिनिटांनी दीक्षाभूमीवर आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले प्रामुख्याने उपस्थित होते. स्मारक समितीचे सदस्य डॉ. राजेंद्र गवई आणि विलास गजघाटे यांनी दीक्षाभूमीच्या प्रवेशद्वारावर त्यांचे स्वागत केले आणि पंतप्रधानांना मध्यवर्ती स्मारकात घेऊन गेले. दरम्यान पंतप्रधानांनी परिसरातील बोधीवृक्षाचेही अवलोकन केले.
मध्यवर्ती स्मारकात गेल्यावर सर्वप्रथम पंतप्रधान मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिकलशाला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
त्यानंतर तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती प्रज्वलित केली. तसेच पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर स्मारकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशासमोरच ते ध्यानस्थ बसले. जवळपास पाच मिनिटे त्यांनी ध्यान साधना केली. यावेळी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांसह सर्व उपस्थित पाहुणे हात जोडून उभे होते.
यानंतर स्मारकावरील वरच्या डोमवर जाऊन पंतप्रधान मोदी यांनी दीक्षाभूमी परिसराची पाहणी केली. नंतर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यानंतर स्मारक समितीच्या सदस्यांशी चर्चा केली आणि ते पुढच्या कार्यक्रमासाठी निघाले. तब्बल २० मिनिटे त्यांनी दीक्षाभूमीवर घालवली. (प्रतिनिधी)
दीक्षाभूमी कोट्यवधी भारतीयांना प्रेरणा देत राहील...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमीवरील व्हिजिट बुकमध्ये आपला अभिप्राय नोंदविला. यात त्यांनी लिहिले आहे की, ‘दीक्षाभूमीवर आज येऊन डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्याचे भाग्य मिळाल्याने मला अतिशय आनंद होत आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ही दीक्षाभूमी कोट्यवधी भारतीयांना सदैव प्रेरणा देत राहील’.