मंगळवारी तलावच्या सौंदर्यीकरणासाठी मुंडण करून वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:10 AM2021-08-27T04:10:34+5:302021-08-27T04:10:34+5:30
नागपूर : नवी मंगळवारी तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या पुढाकारात सुरू असलेल्या आंदोलनाची मनपा प्रशासनाकडून अद्यापही दखल नाही. ...
नागपूर : नवी मंगळवारी तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या पुढाकारात सुरू असलेल्या आंदोलनाची मनपा प्रशासनाकडून अद्यापही दखल नाही. तब्बल १७ दिवस लोटूनही प्रशासनाने लक्ष न दिल्याने बुधवारी महिला व पुरुष कार्यकर्त्यांसह नागरिकांनी सामूहिक मुंडण करून प्रशासनाचे पुन्हा लक्ष वेधले आणि निषेध नोंदविला.
मंगळवारी तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या मागणीसाठी ऑॅगस्ट क्रांतीदिनापासून नागरिकांचे साखळी उपोषण सुरू आहे. रोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपोषण संपल्यावर कार्यकर्ते मनपाच्या सहायक आयुक्त सतरंजीपुरा झोन कार्यालयात जाऊन निवेदन देऊन येतात. मात्र १७ दिवसानंतरही प्रशासनाकडून कसलीही दखल नाही. यामुळे सहा कार्यकर्त्यांनी मुंडण करून निषेध नोंदविला. यात लीना सुनील गजभिये, रोशन डोंगरे, नरेश महाजन, भूषण देशमुख, सेवक बारापात्रे, शेखर मुंढरीकर यांचा समावेश आहे.
उत्तर नागपूर प्रभाग पाचमध्ये सुमारे ३०० वर्षापूर्वीचा हा जुना तलाव आता दुर्गंधीयुक्त झाला आहे. हा तलाव पूर्वी तीन एकर परिसरात होता. आता आजूबाजूस अतिक्रमण झाल्यामुळे तलाव लहान झाला आहे. तलावात गडर लाईनचे पाणी सोडले जाते. घाण, कचरा व निर्माल्य टाकले जाते. यामुळे तलाव दूषित झाल्याने सौंदर्यीकरणाची मागणी सुरू आहे.