प्रवाशांनो लक्ष द्या... आता नागपूरहून थेट गोरखपूरसाठी रेल्वेगाडी; खास उन्हाळ्यात स्पेशल ट्रेन : आजपासून सुरुवात
By नरेश डोंगरे | Published: April 20, 2024 08:48 PM2024-04-20T20:48:32+5:302024-04-20T20:48:59+5:30
नागपूरहून यूपी, बिहारसाठी स्पेशल ट्रेन सुरू करण्यात येणार असल्याचे वृत्त लोकमतने १५ एप्रिलच्या अंकात प्रकाशित केले होते, हे येथे उल्लेखनीय!
नागपूर : प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांची कुचंबना होत असल्याचे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने नागपूरहून थेट उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या स्पेशल ट्रेनची व्यवस्था केली आहे. त्यानुसार, आज रविवार, २१ एप्रिलपासून नागपूर-गोरखपूर ही स्पेशल ट्रेन प्रवाशांना सेवा देणार आहे. नागपूरहून यूपी, बिहारसाठी स्पेशल ट्रेन सुरू करण्यात येणार असल्याचे वृत्त लोकमतने १५ एप्रिलच्या अंकात प्रकाशित केले होते, हे येथे उल्लेखनीय!
दोन महिन्यांपासून दक्षिणेकडून येणाऱ्या सर्वच गाड्या फुल्ल भरून येत आहेत. नागपूर स्थानकावरून मोठ्या संख्येत चढणाऱ्या प्रवाशांची त्यात भर पडत आहे. त्यामुळे आधीच पाय ठेवायला जागा नसल्याने प्रवासी मिळेल त्या डब्यात प्रवास करीत आहेत. त्यामुळे जनरलच नव्हे तर, स्लिपर आणि एसी कोचमधील प्रवाशांनाही त्रास होऊ लागला आहे. स्लिपर, एसी कोचमधील स्वच्छतागृहाजवळ प्रवासी दाटीवाटीने उभे असल्याने, कन्फर्म तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांची तीव्र कुचंबणा होत आहे. लोकमतने या संबंधाने सचित्र वृत्त प्रकाशित केल्यामुळे शीर्षस्थ अधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घेतली होती. या पार्श्वभूमीवर नागपूरहूनच थेट यूपी, बिहारकडे जाण्यासाठी नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात दिल्ली बोर्डाकडे पाठविला होता. त्याचेही वृत्त ‘लोकमत’ने १५ एप्रिलला प्रकाशित केले होते. एका आठवड्यात ही गाडी सुरू होणार असल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने या वृत्तात नमूद केेले होते. या पार्श्वभूमीवर, आज रेल्वे प्रशासनाने ०१२०७ नागपूर-गोरखपूर ही नवीन विशेष रेल्वेगाडी २१ एप्रिलपासून सुरू करण्याची घोषणा केली आहे.
रोज सकाळी सुटणार, दुसऱ्या दिवशी पोहचणार
ही गाडी रविवारपासून दररोज सकाळी ७.३० वाजता नागपूर स्थानकावरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१५ वाजता गोरखपूरला पोहचेल. त्याच प्रमाणे ०१२०८ गोरखपूर-नागपूर ही २२ एप्रिलपासून दररोज सकाळी ९.१५ वाजता गोरखपूर स्थानकावरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता नागपूर स्थानकावर दाखल होईल. भर उन्हाळ्यात सुरू करण्यात आलेल्या या स्पेशल ट्रेनमुळे यूपी बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांना चांगला दिलासा मिळणार, असा विश्वास वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी व्यक्त केला आहे.
या ठिकाणच्या प्रवाशांनाही लाभ
या गाडीला १९ कोच राहणार आहेत. त्यात १२ एसी थ्री टियर ईकॉनाॅमी, ५ सामान्य द्वितीय श्रेणी, १ लगेच कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कारचा त्यात समावेश आहे. नागपूर-गोरखपूर मार्गावरील आमला, बैतूल, घोडाडोंगरी, इटारसी, भोपाळ, ललितपूर, लक्ष्मीबाई झांसी, उरई, पोखरायन, कानपूर सेंट्रल, उन्नाव, ऐशबाग, बादशाहनगर, बाराबंकी, गोंडा, मानकापूर, बस्ती आणि खलीलाबाद आदी स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे.