कर्मयोगीपेंक्षा योगींचे आकर्षण वाढतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 01:29 AM2018-04-11T01:29:43+5:302018-04-11T01:29:53+5:30
संत पंरपरा आणि समाजसुधारणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, याची प्रचिती संत गाडगेबाबा व डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कार्याकडे पाहिल्यावर येते. या दोघांनीही आपल्या कार्यातून शिक्षणासोबतच विवेकवादी दृष्टीही दिली आणि म्हणूनच ते कर्मयोगी ठरले. परंतु दुर्दैवाने आज समाजात कर्मयोगींपेक्षा योगींचे आकर्षण वाढतेय. शिवाजी शिक्षण संस्थेच्याच अनेक प्राचार्यांच्या कक्षात देवतांचे फोटो असतात आणि नेमाने त्यांची आरतीही ओवाळली जाते. हे बघून भाऊसाहेब कसे सुखावतील, असा खडा सवाल डॉ. श्रीकांत तिडके यांनी विचारला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संत पंरपरा आणि समाजसुधारणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, याची प्रचिती संत गाडगेबाबा व डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कार्याकडे पाहिल्यावर येते. या दोघांनीही आपल्या कार्यातून शिक्षणासोबतच विवेकवादी दृष्टीही दिली आणि म्हणूनच ते कर्मयोगी ठरले. परंतु दुर्दैवाने आज समाजात कर्मयोगींपेक्षा योगींचे आकर्षण वाढतेय. शिवाजी शिक्षण संस्थेच्याच अनेक प्राचार्यांच्या कक्षात देवतांचे फोटो असतात आणि नेमाने त्यांची आरतीही ओवाळली जाते. हे बघून भाऊसाहेब कसे सुखावतील, असा खडा सवाल डॉ. श्रीकांत तिडके यांनी विचारला. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त धनवटे नॅशनल कॉलेज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्र आणि शिवाजी विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी आयोजित डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यान कार्यक्रमात ते ‘डॉ. पंजाबराव देशमुख व संत गाडगेबाबा यांचे तत्त्वज्ञान व वास्तव’ या विषयावर बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दिलीप इंगोले तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, हेमंत काळमेघ यांच्यासह मंचावर शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. के. बुरघाटे व धनवटे नॅशनल कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. ए. चंगोले उपस्थित होते. श्रीकांत तिडके पुढे म्हणाले, तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांच्यातील दुवा म्हणजे पंजाबराव देशमुख आहेत. महाराष्ट्रातील या महापुरुषांच्या विवेकवादी परंपरेने समाजाला दिशा दिली. या माणसांच्या कर्तृत्वाबद्दल आपण नेहमी ऐकतो. परंतु त्यांना समजून घेण्यात आपण कमी पडलो हे वास्तव आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. संजय आवटे यांनी ‘डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या विचारांची प्रासंगिकता’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते गाडगेबाबांच्या शेवटच्या कीर्तनाचे पुस्तक आणि या व्याख्यानमालेतील आतापर्यंतच्या सर्व वक्त्यांच्या भाषणाचा संग्रह असलेल्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.