कलावंतांच्या लोकनृत्यामुळे दर्शक मंत्रमुग्ध
By admin | Published: September 27, 2015 02:59 AM2015-09-27T02:59:23+5:302015-09-27T02:59:23+5:30
दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर आणि रामटेक नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रामटेक येथे ‘लोककला यात्रा’ या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले.
लोककला यात्रा : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र व पालिका प्रशासनाचे आयोजन
रामटेक : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर आणि रामटेक नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रामटेक येथे ‘लोककला यात्रा’ या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. कलावंतांनी सादर केलेल्या लोकनृत्यांनी दर्शकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
स्थानिक नेहरू मैदानावर आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन खा. कृपाल तुमाने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. आशिष जयस्वाल, नगराध्यक्ष नलिनी चौधरी, दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. पीयूष कुमार, प्रकल्प संचालक किरण सोनपिंपरे, मुख्याधिकारी गीता वंजारी, छाया वंजारी, विनायक सावरकर, उमेश महाजन, कांता केळवदे, अनिल वाघमारे, कलावती कुंभलकर, वत्सला पाठक, कल्पना अंबादे आदी उपस्थित होते. येत्या दोन महिन्यात कालिदास महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा आशिष जयस्वाल यांनी केली.
विविध राज्यातील कलावंतांनी सादर केलेल्या लोकनृत्यांमुळे दर्शकांचे चांगलेच मनोरंजन झाले. शाळकरी विद्यार्थिनीने सादर केलेल्या गणेशवंदनेवरील नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यात पंजाबचा भांगडा, तसेच मध्य प्रदेशातील शहाडौल व मंडला या आदिवासी भागातून आलेल्या आदिवासींनी गुडुंब बाजा या पारंपरिक वाद्यांसह नृत्य सादर केले. ओडिशातील प्रसिद्ध ‘छाऊ नृत्य’ तसेच राजस्थानच्या कलावंतांनी सादर केलेले ‘कालबेलिया’ आणि ‘भवई’ नृत्याने चांगलीच रंगत आणली. सिद्धी धमाल नृत्याद्वारे आफ्रिका खंडातील आदिवासींची नृत्यसंस्कृती गुजरातच्या कलावंतांनी सादर केली. रामटेकच्या एपी रॉकर्सच्या कलावंतांनीही पंकज डोंगरेच्या नेतृत्वात ‘हम भी किसीसे कम नही’चा परिचय दिला. प्रा. डॉ. सावन धर्मपुरीवार यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. नगर परिषदेचे उपाध्यक्ष रमेश कारामोरे यांनी आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)