नागपूर रेल्वेस्थानकावरील ‘एटीव्हीएम, सीओटीव्हीएम’ बनल्या शोभेच्या वस्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 11:46 AM2018-11-19T11:46:27+5:302018-11-19T11:48:31+5:30

नागपूर रेल्वे स्थानकावर १० ‘एटीव्हीएम’ व ४ ‘सीओटीव्हीएम’ लावण्यात आल्या आहेत. परंतु यातील बहुतांश मशीन्स बंद असल्यामुळे प्रवाशांना भल्यामोठ्या रांगेत उभे राहून तिकीट खरेदी करावे लागत आहे.

ATVM, COTVM, on the Nagpur railway station are out of order | नागपूर रेल्वेस्थानकावरील ‘एटीव्हीएम, सीओटीव्हीएम’ बनल्या शोभेच्या वस्तू

नागपूर रेल्वेस्थानकावरील ‘एटीव्हीएम, सीओटीव्हीएम’ बनल्या शोभेच्या वस्तू

Next
ठळक मुद्देआऊट आॅफ आॅर्डरचा बोर्ड प्रवाशांना काढावे लागतेय रांगेत उभे राहून तिकीट

दयानंद पाईकराव।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेगाडीने प्रवास करण्यासाठी तिकीट काढणे आवश्यक आहे. हे तिकीट काढण्यासाठी अनेक पर्याय प्रवाशांना उपलब्ध आहेत. यात आयआरसीटीसीची वेबसाईट, मोबाईल अ‍ॅप, तिकीट काऊंटरवर काढता येते. याशिवाय नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाने ‘एटीव्हीएम’(आॅटोमेटेड तिकीट व्हेंडिंग मशीन) आणि ‘सीओटीव्हीएम’ (कॉईन आॅपरेटेड तिकीट व्हेंडिंग मशीन) उपलब्ध करून दिल्या आहेत. नागपूर रेल्वे स्थानकावर अशा १० ‘एटीव्हीएम’ व ४ ‘सीओटीव्हीएम’ लावण्यात आल्या आहेत. परंतु यातील बहुतांश मशीन्स बंद असल्यामुळे प्रवाशांना भल्यामोठ्या रांगेत उभे राहून तिकीट खरेदी करावे लागत आहे.
बहुतांश प्रवासी ऐनवेळी रेल्वे स्थानकावर पोहोचतात. पोहोचल्यानंतर ते जनरल कोचचे तिकीट खरेदी करून गाडीत बसतात. अनेकदा गाडीची वेळ झालेली असल्यामुळे त्यांना तिकीट काढण्यासाठी धडपड करावी लागते. अशा वेळी जनरल तिकीट काऊंटरवर प्रवाशांची मोठी रांग असल्यामुळे गाडी सुटण्याची भीती राहते.
त्यासाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकावर १० ‘एटीव्हीएम’ आणि ४ ‘सीओटीव्हीएम’ उपलब्ध करून दिल्या आहेत. या मशीन मुख्य आरक्षण कार्यालय परिसर, रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्याजवळील तिकीट कार्यालय आणि संत्रा मार्केटकडील आरक्षण कार्यालयात लावण्यात आल्या आहेत. परंतु यातील ४ ‘एटीव्हीएम’ आणि १ ‘सीओटीव्हीएम’ मशीन बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
रेल्वे प्रशासनातर्फे या मशीनची दुरुस्ती करण्यात येते. परंतु एका मशीनची दुरुस्ती केली की काही दिवसातच दुसरी मशीन बंद पडते. यामुळे एकाच वेळी प्रवाशांना सर्वच मशीन उपलब्ध राहत नसल्याची
स्थिती आहे.

रेल्वे प्रशासनाची उदासीनता
‘नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाने आॅटोमेटेड तिकीट व्हेंडिंग मशीन आणि कॉईन आॅपरेटेड तिकीट व्हेंडिंग मशीन लावल्या आहेत. परंतु या मशीनची देखभाल करण्याप्रती रेल्वे प्रशासन गंभीर नाही. या मशीन नेहमीच बंद राहतात. कधी कधी या मशीनची दुरुस्ती करण्यात येते. मात्र, काही दिवसातच पुन्हा त्या बंद पडतात. रेल्वे प्रवाशांना कमी वेळात तिकीट मिळू शकत नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने मशीनची देखभाल करणाऱ्या कंपनीला या मशीन त्वरित दुरुस्त करण्याचे आदेश देण्याची गरज आहे.’
-बसंत कुमार शुक्ला, सचिव भारतीय यात्री केंद्र


लवकरच सुरू होतील मशीन
‘नागपूर रेल्वे स्थानकावर ४ एटीव्हीएम आणि १ ‘सीओटीव्हीएम’ मशीन बंद अवस्थेत आहे. या मशीनच्या देखभालीचे काम फोर्ब्स नावाच्या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीचे स्थानिक प्रतिनिधी मशीनच्या देखभालीचे काम करतात. या प्रतिनिधींना मशीनचे स्पेअर पार्ट मिळत नसल्यामुळे देखभाल होऊ शकत नाही. या मशीन लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.’
-कुश किशोर मिश्रा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

Web Title: ATVM, COTVM, on the Nagpur railway station are out of order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.