टी-२० बघण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी

By admin | Published: January 30, 2017 02:43 AM2017-01-30T02:43:45+5:302017-01-30T02:43:45+5:30

भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान रंगणारा टी - २० सामना बघण्यासाठी हजारो क्रिकेटप्रेमींनी जामठा

Audience crowds to watch T-20 | टी-२० बघण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी

टी-२० बघण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी

Next

जामठा जाम : एकाच दिशेने धावत होती हजारो वाहने
नागपूर : भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान रंगणारा टी - २० सामना बघण्यासाठी हजारो क्रिकेटप्रेमींनी जामठा स्टेडियमकडे धाव घेतल्याने नागपूर - वर्धा मार्गावर उत्साह जणू ओसंडून वाहत होता. दुपारी २.३० ते ७ .३० वाजतापर्यंत वर्धा मार्गावरून धावणाऱ्या लहानमोठ्या हजारो वाहनांमुळे आणि खास करून दुचाकीवरील उत्साही क्रिकेटप्रेमींमुळेया मार्गाला एक वेगळेच ग्लॅमर प्राप्त झाले होते.
जामठा स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना असला की नागपूर - वर्धा - चंद्रपूर मार्गावरील वाहतूक प्रभावित होते. सामन्याच्या दिवशी अनेकदा वाहतुकीची कोंडी होते आणि छोटे मोठे अपघात होतात. परिणामी या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची सामन्याच्या दिवशी नाहक कुचंबणा होते. ही बाब लक्षात घेता पोलिसांनी वाहतुकीची कोंडी आणि प्रवाशांची कुचंबणा टाळण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या होत्या. त्यानुसार, दिवसभरात अनेकवेळा टप्प्याटप्प्यात वर्धा मार्गावरची वाहतूक एक मार्गी (वन-वे) करण्यात आली होती. दुपारी २ वाजतापासूनच चिंचभुवन उड्डाण पुलावर कोणतेही वाहन थांबणार नाही, याची खास काळजी पोलिसांनी घेतली होती. नागपूरकडे येणारी वाहतूक डोंगरगावजवळून वळविण्यात येणार होती. तर, नागपूरहून वर्धा, यवतमाळ, चंद्रपूरकडे जाणारी वाहतूक हिंगणामार्गे वळविण्यात आली होती.
रात्री ७ च्या सुमारास सामना सुरू होणार, असे सांगितले जात असले तरी एकाच वेळी क्रिकेट रसिकांची जामठा स्टेडियमसमोर गर्दी होऊ नये म्हणून दुपारी ३ वाजतापासूनच क्रिकेट रसिकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्याचे ठरले होते. क्रिकेट रसिक सार्वजनिक वाहतूक प्रणालीचा (स्टार बस) वापर करण्याऐवजी स्वत:च्याच वाहनांनी येणार, असा अंदाज असल्याने एक किलोमीटर पूर्वीपासूनच ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था निर्माण करण्यात आली होती. दुपारी ४.३० वाजतापासून अचानक क्रिकेट रसिकांच्या वाहनांची गर्दी या मार्गावर वाढली. त्यामुळे खापरीपासून वाहतूक संथ झाली. राहून राहून वाहने पुढे सरकत होती. त्यात दुचाकीचालक मध्येच वाहने घालत असल्याने आरडाओरड करीत असल्यानेही वाहतूक रखडत होती. ते लक्षात आल्याने या मार्गावर बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी दारूच्या नशेत हुल्लडबाजी करणाऱ्या दुचाकीचालकांना प्रसाद दिला. त्यानंतर या मार्गावरची वाहतूक सुरळीत झाली. (प्रतिनिधी)

तरुण झाले सैराट
जामठा टी पॉर्इंटजवळून स्टेडियमकडे निघालेल्या मार्गावर वाहनचालक आणि पायी चालणाऱ्यांची गर्दी होऊन अनुचित घटना घडू शकते, हे ध्यानात घेत पोलिसांनी बॅरिकेडस् लावून हा रस्ता दोन भागात विभागला. डाव्या बाजूने पायी चालणाऱ्यांसाठी तर उजव्या बाजूने वाहनचालकांसाठी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, सायंकाळी ६ च्या सुमारास लवकर स्टेडियममध्ये पोहोचण्यासाठी काही युवक गर्दीच्या मधातून तरुणींना धक्के देत सुसाट निघाले. ते वेगात असलेल्या वाहनांनाही चुकविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाला. ते पाहून या भागातील पोलिसांनी लगेच सैराट झालेल्या या तरुणांना पकडले. त्यांना रस्त्याच्या बाजूला नेऊन त्यांची ओळख पटवून घेतली. त्यानंतर त्यांना ताकीद देऊन सोडण्यात आले. असाच प्रकार स्टेडियमच्या गेट नंबर ३ आणि ४ समोर झाला. काही तरुण नुसतेच आरडाओरड आणि गोंधळ करीत होते. बराच वेळ होऊनही त्यांचा गोंगाट थांबण्याचे नाव घेत नसल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर मात्र गोंगाट करणारे तरुण पळून गेले.

खेळाडूंची बस ‘राँग साईड’
४या मार्गावरची वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी म्हणून दुपारी २.३० वाजतापासूनच पोलीस कामी लागले होते. मात्र, सायंकाळचे ५.३० वाजूनही जामठ्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या कमी होण्याऐवजी सारखी वाढतच असल्याने पोलिसांनी नागपूरकडे येणारा मार्ग जामठा टी पॉर्इंटवर अडवला. सर्वच्यासर्व वाहने थांबवून ठेवत खेळाडूंची बस नागपुरातील हॉटेलमधून स्टेडियमकडे जाण्यासाठी काढण्यात आली. डावीकडच्या मार्गावरून बस नेल्यास मध्येच अडू शकते. बसमधील खेळाडूंना धोकाही होऊ शकतो, हे ध्यानात आल्याने पोलिसांनी आपल्या वाहनांच्या गराड्यात उजव्या बाजूने (राँग साईड) बस काढली आणि खेळाडूंना जामठा स्टेडियममध्ये पोहोचविले. खेळाडू मैदानात पोहोचेपर्यंत टी पॉर्इंट ते स्टेडियमपर्यंतच्या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली होती. दरम्यान, मोठ्या प्रमाणात वाहने एकाच बाजूने धावत असल्याने अनेक वाहनचालकांचे एकमेकांना धक्के (कट) लागणे, बाचाबाची होणे, असे प्रकारही घडले. वृत्त लिहिस्तोवर कुठे अपघात झाल्याची माहिती आमच्याकडे आली नाही, असे वाहतूक शाखेच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी लोकमतला सांगितले. खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊनच खेळाडूंची बस राँग साईड काढण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शेवटचा चेंडू अन् तरुणाईची आतषबाजी
४अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या सामन्याचा निकाल शेवटचा चेंडूवर अवलंबून होता. षट्कार की डॉट बॉल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर डॉट बॉल पडला आणि भारताच्या विजयाने हर्षभरीत तरुणाईने फटाक्यांच्या आतषबाजीत एकच जल्लोष केला. रवीनगर, लॉ कॉलेज चौक, फुटाळा तलाव या ठिकाणी एकत्र येत तरुणाईने या विजयाचा आनंद साजरा केला. आज रविवार असल्याने अनेक जण घरीच मॅचचा आनंद घेत होते. भारत विजयी होताच यातले अनेक जण हातात तिरंगा घेऊन बाहेर पडले व त्यांनी या विजयाचा जल्लोष केला. शहरातल्या विविध भागातही आतषबाजी आणि जल्लोषाचे असेच चित्र होते.

Web Title: Audience crowds to watch T-20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.