दोन लाखांवरील बिलाचे ऑडिट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:07 AM2021-05-19T04:07:49+5:302021-05-19T04:07:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना रुग्णांची खासगी रुग्णालयांकडून होणारी आर्थिक लूट थांबावी. यासाठी राज्य शासनाने खासगी रुग्णालयातील ८० ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना रुग्णांची खासगी रुग्णालयांकडून होणारी आर्थिक लूट थांबावी. यासाठी राज्य शासनाने खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड शासकीय दरानुसार उपलब्ध करण्याचे आदेश दिले. तसेच खासगी रुग्णालयातील दर नियंत्रणाखाली आणण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. परंतु नागपूर शहरातील खासगी रुग्णालयाकडून रुग्णांची आर्थिक लूट सुरू आहे. याला आळा घालण्यासाठी मनपा प्रशासनाने खासगी रुग्णालयात ८० टक्के व २० टक्के खासगी बेडवर उपचार घेणाऱ्या रुग्णाकडून वसूल करण्यात आलेल्या दोन लाखांहून अधिकच्या बिलाचे ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी मनपाचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या पत्रातून केली आहे.
बहुसंख्य कोविड रुग्णांकडून दोन लाखांंहून अधिक बिल वसूल करण्यात आले आहे. ते कुठल्या आधारावर वसूल करण्यात आले. याची मनपाने ऑडिटरव्दारे चौकशी करून रुग्णांना न्याय द्यावा. तसेच हॉस्पिटलकडून वसूल करण्यात आलेल्या बिलाची माहिती घेऊन ती उपलब्ध करावी. अशी मागणी वनवे यांनी केली आहे. तसेच बिलासंदर्भात तक्रार असल्यास नागरिकांनी मनपातील विरोधी पक्षनेता यांच्या कार्यालयाकडे द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
....
रुग्णांची लूट थांबवा
कोरोनामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. त्यात खासगी रुग्णालयांकडून अव्वाच्यासव्वा बिल आकारणी केली जात आहे. शासन निर्णयानुसार ८० टक्के बेड शासकीय दराने उपलब्ध करणे अपेक्षित आहे. परंतु असे असूनही रुग्णांकडून जादा बिल वसूल केले जात आहे. दोन लाखांहून अधिक बिलांची मनपाने चौकशी करावी. ती कुठल्या आधारावर आकारण्यात आले याची शहानिशा करून रुग्णांना न्याय द्यावा, अशी मागणी नगरसेवक संजय महाकाळकर यांनी केली आहे.