आॅडिटमध्येच नागपुरातील राजभवनच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 08:22 PM2018-05-28T20:22:59+5:302018-05-28T21:18:10+5:30

भारताचे महामहीम राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, चीफ जस्टिस आॅफ इंडिया अशा अतिविशेष व्यक्ती कधी उपराजधानीत आल्या तर त्यांच्या निवासाचे ठिकाण म्हणजे राजभवन. त्यामुळे अतिमहत्त्वाच्या या वास्तूच्या सुरक्षेचा प्रश्नही तेवढाच महत्त्वाचा आहे.

In Audit Report The question of the security of the Raj Bhavan in Nagpur | आॅडिटमध्येच नागपुरातील राजभवनच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

आॅडिटमध्येच नागपुरातील राजभवनच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Next
ठळक मुद्देधोकादायक अतिक्रमण हटवणार कधी?कुणीही करू शकतो परिसरात प्रवेश, कारवाईकडे मात्र प्रशासनाचा कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारताचे महामहीम राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, चीफ जस्टिस आॅफ इंडिया अशा अतिविशेष व्यक्ती कधी उपराजधानीत आल्या तर त्यांच्या निवासाचे ठिकाण म्हणजे राजभवन. त्यामुळे अतिमहत्त्वाच्या या वास्तूच्या सुरक्षेचा प्रश्नही तेवढाच महत्त्वाचा आहे. प्रशासन मात्र या महत्त्वाच्या विषयाबाबत अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. आकर्षक वनसंपदेने व्यापलेल्या राजभवन परिसराच्या सुरक्षा भिंतीपर्यंत अनेक वर्षापासून झालेले अतिक्रमण सुरक्षेला छेद देणारे ठरू शकते. विविध विभागांकडून संयुक्तपणे राबविलेल्या सुरक्षा आॅडिटमध्येच ही बाब अधोरेखित केली आहे. असे असतानाही कारवाईची जबाबदारी असलेले मनपा प्रशासन, पोलीस विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही या सुरक्षा आढाव्याची गंभीरतेने दखल घेतली जात नाही, यापेक्षा वेगळी शोकांतिका ती काय?
नुकतेच नागपूर शहर पोलीस विशेष शाखा, शहर अधिकारी, राज्य गुप्त वार्ता विभाग, केंद्रीय गुप्त वार्ता विभाग, दहशतवादविरोधी पथक, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच राजभवन येथील परिवार प्रबंधक यांनी संयुक्तपणे राजभवनच्या आंतरिक व बाह्य सुरक्षेची पाहणी केल्यानंतर सुरक्षेचा आॅडिट रिपोर्ट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सोपविला आहे. या अहवालात अनेक गंभीर बाबी अधोरेखित केल्या आहेत. राजभवनच्या बाह्य भागात फेरफटका मारल्यास याचे प्रत्यंतर येते.
धोकादायक अतिक्रमण कोणते?
अहवालात नमूद केल्यानुसार आणि प्रत्यक्ष पाहणीत हे धोकादायक अतिक्रमण दिसून येते. राजभवनाच्या दक्षिणेकडे बिजलीनगर भागात सुरक्षा भिंतीलगत कापडी पाल टाकलेल्या झोपड्या बनविल्या आहेत. याशिवाय दक्षिणेकडे खाटिकपुरा भागात राजभवनाच्या टॉवर ११ व १२ समोर संरक्षक भिंतीलगत रहिवाशांची पक्की घरे, मनपाच्या नगरभूमापनचे बंद पडलेले कार्यालय, मुस्लीम लायब्ररी आदींचे बांधकाम संरक्षक भिंतीवर असलेल्या काटेरी तारांच्या वेटोळ्या कुंपणापर्यंत घुसले आहे. यासोबतच सुरक्षा भिंतीलगत बांधलेले महानगरपालिकेचे सार्वजनिक शौचालय, पूर्वेकडे काटोलकडे जाणाऱ्या मार्गावर हनुमान मंदिराच्या नावाने पुजाºयाने अतिक्रमण केले आहे. या अतिक्र मण झालेल्या बांधकामावरून कुणालाही राजभवनात ये-जा करणे शक्य आहे. या संवेदनशील ठिकाणाहून कुणीही आतमध्ये प्रवेश करू शकतो आणि घातपात घडवून आणू शकतो, असे सुरक्षा अहवालात नमूदही केले आहे. त्यामुळे या अतिक्रमणावर कारवाई करण्याची सूचनाही अहवालात अधोरेखित केली आहे.
 तारांचे कुंपण तोडून चोरीचा प्रयत्न
बिजलीनगर, खाटिकपुरा भागात सुरक्षा भिंतीवर असलेले काटेरी कुंपण तोडलेले आढळून आले. याबाबत राजभवनचे प्रभारी अधिकारी रमेश यावले यांनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वी हे कुंपण तोडून आतमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. अज्ञात चोरट्यांनी मधमाशा पालनासाठी विकत आणलेले बॉक्स चोरून नेण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.
अनेकदा बैठका, कारवाईचे आदेश
विशेष बाब म्हणजे हा सुरक्षा आॅडिट रिपोर्ट पहिल्यांदा दिला गेला नाही. हे अतिक्रमण गेल्या अनेक वर्षापासून राजभवनाच्या सुरक्षेला छेद देणारे आहे. त्यामुळे या विषयाला धरून विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी, नझूल अधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त व अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी, नगर भूमापन विभाग, बांधकाम विभागाच्या अधिकाºयांच्या अनेकदा बैठका झाल्या आहेत. विविध पोलीस आयुक्तांनीही या अतिक्रमणाबाबत कारवाईचे आदेश दिले आहेत. एवढेच नाही तर राज्यपालांच्या सचिवांकडूनही या सुरक्षेच्या गंभीर प्रश्नांवर चिंता व्यक्त करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. राजभवन परिसराची विनामूल्य मोजणी करून राजभवनाच्या सर्व मालमत्तांच्या आखीव पत्रिका, नकाशे अद्ययावत करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. मात्र विभागीय आयुक्त, राज्यपालांच्या सचिवांच्या आदेशाकडेही अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले व हा प्रकार आजही तसाच सुरू आहे.
 मंदिराच्या नावाने ९००० चौ.फूट जागेवर अतिक्रमण
राजभवनाच्या पूर्वेकडे हनुमान मंदिराचे बांधकाम केले आहे. मात्र या मंदिराच्या नावाने पुजाऱ्याने राजभवनच्या जवळपास ९ हजार चौरस फूट जागेवर अनेक वर्षापासून अतिक्रमण केले आहे. हे प्रकरण न्यायालयात असून संबंधित पुजाऱ्याने न्यायालयात जागेची खोटी सनद सादर केल्याची माहिती रमेश यावले यांनी दिली. राज्यपालांचे सचिव व विभागीय आयुक्तांनी ही गंभीर बाब अधोरेखित केली आहे. न्यायालय हे प्रकरण लवकर निकाली काढेल, अशी अपेक्षा यावले यांनी व्यक्त केली.
खाद्यपदार्थाच्या स्टॉलची वर्दळ
राजभवनाच्या पूर्वेकडे सदर गेटसमोर सायंकाळी ६ पासून रात्री ११ वाजतापर्यंत खाद्यपदार्थ व चायनीज स्टॉल्सची वर्दळ असते. या अतिक्रमणावर कारवाई करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी वारंवार दिले आहेत. मात्र कारवाईबाबत महानगरपालिकेचा ढिसाळपणा सातत्याने होत आहे. 

रहिवासी राजभवनमध्ये सर्रास फेकतात कचरा

आसपासच्या परिसरातील नागरिकांकडून फेकला जाणारा कचरा राजभवनच्या वनसौंदर्याला गालबोट लावणाराच आहे. बिजलीनगर, खाटीकपुरा, स्वीपर कॉलनी परिसरात राजभवनच्या सुरक्षा भिंतीलगत राहणारे नागरिक घरातील कचरा सर्रासपणे राजभवनच्या परिसरात फेकतात. राजभवनच्या परिसरात व्यापलेल्या वनसंपदेमुळे या परिसराला अलौकिक रूप प्राप्त झाले आहे. दरवर्षी २० हजाराच्यावर शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी या परिसराला भेट देऊन जैवविविधतेचे रूप अनुभवत असतात. मात्र नागरिकांच्या बेजबाबदार व्यवहारामुळे सौंदर्याला हानी पोहचत आहे. जवळचे रहिवासी घरातील कचरा येथे फेकतात. त्यामुळे राजभवनच्या परिसरात जुने कपडे, प्लास्टीक पिशव्या, कचरा, दारूच्या बाटल्यांचा सडा पडलेला आढळतो. या रहिवाशांना अनेकदा नोटीसह बजावली आहे. मात्र हे लोक प्रशासनाच्या नोटीसांनाही जुमानत नसल्याचे दिसून येते.
विभागीय आयुक्तांनी अनेकदा राजभवनच्या परिसरात झालेल्या अतिक्रमणावर कारवाईचे निर्देश दिले आहेत. याशिवाय राज्यपालांचे सचिव यांनीही वारंवार चिंता व्यक्त करून कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र महानगरपालिका प्रशासन, पोलीस विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कारवाईबाबत कठोर पावले उचलली जात नाही. सुरक्षेच्या गंभीर प्रश्नांबाबत असे अक्षम्य दुर्लक्ष समजण्याच्या पलीक डे आहे. कचरा फेकण्याच्या समस्येबाबतही हाच प्रकार दिसून येतो. 
 रमेश येवले, प्रभारी अधिकारी, राजभवन

 

Web Title: In Audit Report The question of the security of the Raj Bhavan in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर