पाणी टाक्यांचे होणार संरचना अंकेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:27 AM2020-12-11T04:27:14+5:302020-12-11T04:27:14+5:30

कळमेश्वर : तालुक्‍यातील जीर्ण झालेल्या पाणी टाक्यांचे संरचना अंकेक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करून अहवाल तयार झाल्यानंतर टाकी पाडून त्या जागी ...

Audit of water tanks | पाणी टाक्यांचे होणार संरचना अंकेक्षण

पाणी टाक्यांचे होणार संरचना अंकेक्षण

Next

कळमेश्वर : तालुक्‍यातील जीर्ण झालेल्या पाणी टाक्यांचे संरचना अंकेक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करून अहवाल तयार झाल्यानंतर टाकी पाडून त्या जागी नवीन टाकीचे बांधकाम करायचे किंवा इतर उपाययोजना कराव्या लागणार याकरिता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे. तालुक्यात तीन टाक्या अती जीर्ण आहेत. त्याऐवजी नवीन टाक्या बांधकामासाठी ५१ लाख रुपयाच्या निधीची गरज भासणार आहे. कळमेश्वर तालुक्यातील गावांतर्गत १२० च्या जवळपास पाणी टाक्या आहेत. या टाक्यांपैकी अनेक टाक्या जीर्ण झाल्या आहेत. तर काहींना गळती लागलेली आहे. तसेच काही गावातील टाक्या दहा-पंधरा वर्षांपूर्वीच्या लोकसंख्येची पाण्याची गरज लक्षात घेता बांधण्यात आल्या आहेत. यामुळे अनेक गावात वाढीव पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने नव्या टाक्या बांधणे अपेक्षित आहे. सध्या तालुक्यात कोहळी, दहेगाव व सावळी (खुर्द) या गावातील पाणी टाक्या जीर्ण झाल्या आहेत. या तीनही गावात केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत नवीन पाणी टाक्या प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या टाक्यांची पाणी साठवण्याची क्षमता १५ वर्षानंतर असणाऱ्या प्रकल्पित लोकसंख्येवर तसेच अस्तित्वातील जी वापरू शकू अशा टाकीची क्षमता लक्षात घेऊन ठेवण्यात येणार आहे. शासनाच्या नवीन नियमावलीनुसार प्रति माणसी ५५ लिटर पाणी पुरविणे अपेक्षित आहे. कोहळी येथे एक लाख लिटर क्षमतेची पाण्याच्या टाकीसाठी ३५ लाख रुपये खर्च अपेक्षित असून सावळी (खुर्द) येथे २० हजार लिटर क्षमतेच्या टाकीसाठी ८ लाख तर दहेगाव येथे २० हजार लिटर क्षमतेच्या टाकीसाठी ८ लक्ष अशी एकूण ५१ लक्ष रुपये निधीची गरज भासणार आहे.

----

तालुक्यातील जीर्ण टाक्यांची संरचना अंकेक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करून योग्य उपाययोजना करण्यात येईल. याकरिता ग्रामपंचायतींना सूचना दिल्या आहेत.

रत्नदीप रामटेके

सहायक अभियंता श्रेणी २,

ग्रामीण पाणी पुरवठा,उपविभाग सावनेर

----

पाण्याच्या टाकीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी तसेच पाणी टाकी व नवीन पाईपलाईन साठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे.

मंगेश चोरे, सरपंच, ग्रामपंचायत सावळी (खुर्द)

----

२०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या १२०० आहे. परंतु सध्या लोकसंख्या २२०० च्या जवळपास असुन प्रत्येक नागरिकाला पाणी पुरवठा करण्यासाठी १ लाख लिटर क्षमतेच्या टाकीची गरज आहे.

विजय निंबाळकर, सरपंच, ग्रामपंचायत दहेगाव.

Web Title: Audit of water tanks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.