खासगी रुग्णालयांचे ऑडिटिंग, १७.५१ लाख परत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:08 AM2021-06-09T04:08:51+5:302021-06-09T04:08:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मेडिकल हबच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरात ६५० रुग्णालये आहेत. यातील १५२ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकल हबच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरात ६५० रुग्णालये आहेत. यातील १५२ खासगी रुग्णालयांत कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. १५ मार्च ते १५ मेदरम्यान कोरोना रुग्णांची संख्या मोठी होती. एप्रिलमध्ये नागपूर जिल्ह्यात दररोज सात हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. शासकीय व खासगी रुग्णालयांत बेड मिळत नव्हते. खासगी रुग्णालयांत अॅडव्हान्स जमा केल्याशिवाय उपचार करत नव्हते. दुसरीकडे कोविड रुग्णांकडून अवाच्या सव्वा बिल वसूल करीत होते. गेल्या वर्षभरात अधिक बिल आकारल्याच्या ५०५ अधिक तक्रारी मनपाला प्राप्त झाल्या. यातील ३३७ प्रकरणांत १७ लाख ५१ हजार ७४७ रुपये परत करण्यात आले. अन्य प्रकरणांत कार्यवाही सुरू आहे.
...
निर्धारित दरापेक्षा अधिक वसुली
खासगी कोविड रुग्णांकडून निर्धारित दराच्या तुलनेत अधिक बिलाची वसुली केली जात आहे. रेमडेसिविर इंजेक्शन ५ ते १० हजारांना दिले जात होते. बेड व औषधीचे अधिक बिल वसूल केले जात असल्याच्या तक्रारी आहेत.
....
१०० ऑडिटरची नियुक्ती
खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणाऱ्या अवाच्या सव्वा बिलासंदर्भातील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी मनपाने १०० खासगी रुग्णालयांसाठी स्वतंत्र ऑडिटरची नियुक्ती केली आहे; परंतु अधिक बिल आकारूनही अनेक रुग्ण वा त्यांचे नातेवाईक तक्रार करीत नाहीत.
...
लाखाच्या खाली बिल नाही
कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांकडून लाखाच्या आत सहसा कुणाचेही बिल नाही. काही रुग्णांकडून ५ ते १० लाखांपर्यंत बिल आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. यात २० टक्के बेडसंदर्भातील तक्रारी अधिक आहेत.
......
तक्रार निराकरणासाठी समिती गठित
खाजगी रुग्णालयांतर्फे कोरोनाबाधित रुग्णांचे उपचार करताना निर्धारित दरापेक्षा जास्त दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारीचे तातडीने निराकरण करण्यासाठी महापालिकेतर्फे तज्ज्ञ लोकांची एक विशेष समिती गठित करण्यात आली आहे.
........
नियमबाह्य बिल परत करण्याची कार्यवाही
खासगी रुग्णालयांकडून अनियंत्रित प्रवर्ग वगळून निर्धारित दरापेक्षा अधिक बिल आकारल्याबाबतच्या तक्रारींची ऑडिटरकडून चौकशी केली जाते. नियमाबाह्य बिल आकारल्यास संबंधित रुग्णांना परत करण्यासाठी कार्यवाही केली जाते.
-जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त, मनपा