महाराष्ट्र्रात औरंगजेबाचे उदात्तीकरण सहन करणार नाही - उपमुख्यमंत्री फडणवीस
By योगेश पांडे | Published: June 7, 2023 04:44 PM2023-06-07T16:44:45+5:302023-06-07T16:45:02+5:30
राज्याविरोधात कट रचणाऱ्यांचा शोध घेणार
नागपूर : महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे राज्य आहे. येथे औरंगजेबाचे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही आणि असे करणार्यांना माफीदेखील मिळणार नाहीच. अचानक औरंगजेबाच्या इतक्या अवलादी महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या हा मोठा सवाल असून याचा शोध घेण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपुरात ते बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्राचे नाव खराब कोण करत आहे व या घटनांच्या मागे बोलविते धनी कोण, हेही आम्ही शोधून काढू. जाणूनबुजून महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था बिघडविण्यासाठी व राज्याचे नाव खराब करण्यासाठी कोण असा कट रचत आहे याचादेखील शोध घेण्यात येईल. कुणी कायदा हातात घेतला तर महाराष्ट्राच्या नावलौकिकावर डाग लागतो. कायदा कुणी हातात घेतला, तर कारवाई केली जाईल. कोल्हापूरमध्ये परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे. पोलिस बंदोबस्त आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले.