अधिकारी विचारताहेत कुठे आहेत खड्डे

By admin | Published: January 8, 2016 03:49 AM2016-01-08T03:49:22+5:302016-01-08T03:49:22+5:30

विमानतळावरील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाची आता हद्द झाली. विमानतळाच्या सुरक्षा भिंतीत मोठाले खड्डे पडले आहेत.

The authorities are asking where the potholes are | अधिकारी विचारताहेत कुठे आहेत खड्डे

अधिकारी विचारताहेत कुठे आहेत खड्डे

Next

निष्काळजीपणाचा कळस : जनावरांची ये-जा सुरूच
वसीम कुरैशी नागपूर
विमानतळावरील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाची आता हद्द झाली. विमानतळाच्या सुरक्षा भिंतीत मोठाले खड्डे पडले आहेत. ते छायाचित्रांसह अधिकाऱ्यांच्या लक्षातही आणून दिले गेले. तरीही येथील अधिकारी विचारताहेत ‘सांगा कुठे आहेत खड्डे’. लोकमतने ७ जानेवारी रोजीच्या अंकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या त्रुटींवर छायाचित्रांसह वृत्त प्रकाशित केले होते. या माध्यमातून विमानतळावरील त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. त्या दूर करण्याऐवजी अधिकारी वृत्त लिहिणाऱ्या प्रतिनिधीलाच ‘सांगा कुठे आहेत खड्डे’ असा प्रश्न विचारित आहेत.
नागपूरच्या विमानतळावर १४ आॅक्टोबर २०१५ रोजी राष्ट्रपतींच्या विमानासमोरच डुकरे येतात. या प्रकरणाची चौकशी केली जाते. यात एक मोठी प्रक्रिया चालते. संबंधित सर्व एजन्सी आपापले अहवाल देतात. परंतु त्या अहवालात काय आहे, हे अजूनही माहीत होत नाही. तसेच डीजीसीएतर्फे कुठले ठोस पाऊल उचलण्यात आले, हे कळायलाही मार्ग नाही. पठाणकोटवर दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात रेड अलर्ट घोषित करण्यात आले आहे. अशा वेळी नागपुरातील विमानतळावरील ही परिस्थिती आणखीनच गंभीर ठरते. नागपूर विमानतळ हे संवेदनशील आहे. काही दिवसांपूर्वीच आयएसमध्ये भरती होण्यासाठी जात असलेल्या हैदराबादच्या तीन तरुणांना विमानतळावरून पकडण्यात आले. एका वर्षापूर्वी भिंत ओलांडून लपून बसलेला एक संशयित आरोपी सुद्धा येथे पकडण्यात आला होता. असे असतानाही येथील सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे.
कार्गो आणि स्कॅनिंग मशीनची परिस्थिती तर आणखीनच बिकट आहे. येथील तिन्ही मशीन बंद पडल्या आहेत.
जबलपूर येथील डुमना विमानतळावर विमानाच्या खाली येऊन एका जंगली डुकराचा मृत्यू झाला. त्यानंतर डायरेक्टर जनरल आॅफ एव्हिएशन (डीजीसीए)ने त्या विमानतळाचा परवाना रद्द केला होता. लहान विमानतळ असल्याने तडकाफडकी निर्णय घेण्यात आला.

चौकशीत अनेक गोष्टी दुर्लक्षित
नागपुरातील विमानतळावर राष्ट्रपतींच्या विमानासमोरच डुकरे आली होती. या घटनेची उच्चस्तरावर चौकशी करण्यात आली. परंतु नागपुरातील अधिकाऱ्यांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह कायम आहे. सूत्रानुसार सोलर फेन्सिंगवर विशेष लक्ष देण्यात आले नाही. विमानतळावरील सुरक्षा भिंतीमध्ये मोठे छिद्र पडले आहेत. त्यातून जनावरे सर्रासपणे ये-जा करू शकतात,ही गोष्ट मिहान इंडिया लिमिटेडचे अधिकारी मानायलाच तयार नाहीत.महिनाभरापूर्वी डीसीसीएच्या उपसंचालक शुभी सक्सेना नागपुरात आल्या होत्या. त्यापूर्वी पूर्व-पश्चिम क्षेत्रातील अधिकाऱ्यांनीसुद्धा विमानतळाची पाहणी केली होती. सर्व अहवालावर विचार केल्यानंतरही कुठलेही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही.
जबाबदारी सोपविण्याची प्रतीक्षा
नागपूर विमानतळाला खासगी हातात देणे आणि तिसऱ्या भागीदाराची प्रतीक्षा करण्याशिवाय एमआयएल काहीही करत नसल्याचे दिसून येत आहे. ६ वर्षाच्या हस्तांतरणानंतर सर्व मोठी कामे किंवा बांधकाम एअरपोर्ट अथॉरिटी आॅफ इंडियाने केले आहेत. एमआयएलमधील बहुतांश कर्मचारी सुद्धा अथॉरिटीचेच आहेत.

सोबत चला, दाखवा खड्डे
सुरक्षा भिंतीच्या खालून जनावरे विमानतळाच्या आत जात असल्याचे प्रकाशित छायाचित्र हे दुसऱ्या ठिकाणचे असून शकते. यावर यावर आमचा विश्वास नाही. सोबत चाला आणि दाखवून द्या कुठे आहेत खड्डे. ती आॅपरेशनल वॉल नाही.
-अवधेश प्रसाद, वरिष्ठ विमानतळ निदेशक (एमआयएल)

डुक्कर करतात हल्ले
विश्वस्त सूत्रानुसार विमानतळाच्या आॅपरेशनल बाऊंड्री वॉलजवळ जंगली डुक्कर आढळून येत आहेत. या डुकरांचे छायाचित्र काढण्याच्या प्रयत्नात एक डुक्कर फोटो काढणाऱ्यावरच धावून आला होता. त्यामुळे त्याचे फोटो काढता आला नाही.
बंद पडल्या आहेत
तिन्ही मशीन
एअरपोर्टवर अगोदरच दोन कार्गो स्कॅनिंग मशीन बंद पडले आहे. आता एमआयएलची मशीन सुद्धा बंद पडली आहे. सूत्रानुसार केवळ एका मशीनवर काम सुरू होते. त्यामुळे अधिक भार वाढल्याने त्या मशीनने सुद्धा काम करणे बंद केले आहे. गुरुवारी सायंकाळी चर्चा करतांना एमआयएलचे वरिष्ठ विमानतळ निदेशकांनी मात्र मशीन सुरू असल्याचा दावा केला.

Web Title: The authorities are asking where the potholes are

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.