महामार्गवरील प्रवाशांच्या सुरक्षेकडे प्राधिकरणाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:08 AM2021-03-01T04:08:08+5:302021-03-01T04:08:08+5:30
नागपूर : महामार्ग प्रशस्त झाले, वाहनांचा वेग वाढला, मात्र प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी योग्यपणे घेतली जात नसल्याने अपघातांचाही धोका तेवढाच ...
नागपूर : महामार्ग प्रशस्त झाले, वाहनांचा वेग वाढला, मात्र प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी योग्यपणे घेतली जात नसल्याने अपघातांचाही धोका तेवढाच वाढलेला आहे. डिव्हायडरवर झुडपांची लागवड न करणे, रेडियम पेंटच्या पट्ट्या न आखणे आणि जोडरस्त्यावर योग्य मार्किंग न करणे यामुळे धोका कायम आहे.
नागपूर ते जाम, व पुढे जाम ते वरोरा, पडोली ते यवतमाळ, आणि वरोरा ते बामणी या मार्गावर सध्या चांगलीच वाहतूक वाढली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासोबतच महामार्ग प्राधिकरणाकडे येथील कामाची आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. यासाठी संबंधित कंपन्यांकडे जबाबदारी सोपविली आहे.
पडोली ते यवतमाळ या मार्गाचे काम आयव्हीआरसीएल या कंपनीकडे आहे. त्याची देखरेख यवतमाळ अधिक्षक अभियंत्यांकडे आहे. या मार्गावर असलेल्या डिव्हायडरवर झुडपांची लागवड दिसत नाही. रेडियमचे पट्टेही मारलेले नाहीत. एवढेच नाही तर रिफ्लेक्टरही आता दिसत नाही. या मार्गावर प्रचंड जड वाहतूक असते. विरूद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांचा प्रकाशझोत थेट डोळ्यावर येत असल्याने कारचालकांची तसेच दुचाकीचालकांची चांगलीच अडचण होते. रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी मुरूम टाकण्यात आला नसल्याने रात्री अपघाताचा धोका असतो. खड्डेही आता वाढत आहेत.
जाम ते नागपूर हा राष्ट्रीय मार्ग महामार्ग प्राधिकरणाकडे आहे. या मार्गाची स्थिती चांगली असली तरी अनेक ठिकाणी डिव्हायडवर झुडपांची लागवड नाही. प्राधिकरणाने कंत्राटदाराकडे याचे काम दिले असले तरी संपूर्ण मार्गात हे काम झालेले दिसत नाही. जाम ते वरोरा या मार्गाचे काम मात्र संबंधित कंपनीने अलिकडेच केले. खड्डे बुजविण्यापासून तर रेडियमचे पट्टे आखण्यापर्यंत काम झाल्याने वाहनचालकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
वरोरा ते बामणी या मार्गाचीही स्थिती अशीच आहे. डिव्हायडरवर कुठेच झुडपांची लागवड नाही. रेडियम पट्टेही आता दिसत नाही. लावलेले रिफ्लेक्टरही निघाल्यावर पुन्हा त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. या मार्गवरील वाहतुकीचा ताण मोठा आहे. दुचाकीसह कार सारख्या वाहनांचीही संख्या या मार्गावर अधिक आहे.
...
मोकाट जनावरांचा बंदोबस्त व्हावा
महामार्गाच्याा कडेला असणाऱ्या गावांतील जनावरे थेट महामार्गावर येतात. त्यामुळे अपघात होतात. यावर नियंत्रण राखण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते इबादूल सिद्धीकी यांनी केली आहे. संबंधित गावकऱ्यांचे प्रबोधन करून त्यांना यामुळे होणारे धोके पटवून दिले जावे, अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या जनावरांच्या मालकांवर गुन्हे दाखल व्हावे. तसेच रस्त्याच्या कडेला फळझाडे लावण्यात यावी. बाभुळ व बोरीची काटेरी झुडपे काढण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
...
कोट
नागपूर ते जाम या मार्गावरील डिव्हायडरवर झाडे लावण्यासाठी कंत्राट दिले आहे. काही िठकाणी चांगली झाडे झाली असून संगोपणही होत आहे. मार्गात सर्वच ठिकाणी झाडे झावण्याचे नियोजन आहे. खड्डेही बुजविण्यात आले आहेत.
- नीलेश येवतकर, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरण महामार्ग क्र. ७
...