आॅटो बंद; नागरिक त्रस्त
By admin | Published: September 3, 2015 02:40 AM2015-09-03T02:40:07+5:302015-09-03T02:40:07+5:30
उपराजधानीतील आॅटोचालक-मालक संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली. बंदमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले.
वाहतूक व्यवस्था कोलमडली: ११ हजारांवर आॅटोंची चाके थांबली
नागपूर : उपराजधानीतील आॅटोचालक-मालक संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली. बंदमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले. असंख्य पालकांना सकाळीच उठून आपल्या पाल्यांना शाळेत सोडण्यासाठी धावपळ करावी लागली. तर रेल्वेस्थानक आणि बसस्थानकावरील प्रवाशांचेही मोठे हाल झाले.
नागपूर जिल्हा आॅटो चालक-मालक महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी बुधवारी आॅटो बंदचे आवाहन करण्यात आले. यात शहरातील राष्ट्रवादी आॅटो युनियन रेल्वेस्टेशन, भारतीय आॅटो चालक-मालक युनियन, सक्रिय आॅटोरिक्षा चालक फेडरेशन गणेशपेश बसस्थानक, अजनी रेल्वेस्टेशन, महाराष्ट्र आॅटो चालक युनियन वाडी, रिपब्लिकन पँथर्स आॅटो रिक्षा संघटना इंदोरा, स्कूल आॅटो चालक मंच वर्धा रोड, राष्ट्रीय आॅटो रिक्षा संघटना, पॅथर्स आॅटो रिक्षा फ्रंट गड्डीगोदाम, अन्याय निवारण हक्क संरक्षण आॅटो संघटना इंदोरा, नाग विदर्भ संचालित आॅटो रिक्षा संघटना वर्धमाननगर, पँथर्स टॅक्सी आॅटोरिक्षा चालक मालक संघ ताजबाग, परवानाधारक आॅटो रिक्षा व्यावसायिक अधिकार संघर्ष समिती, एकता आॅटोचालक मालक संघटना बुटीबोरी आदी संघटनांचे हजारो आॅटोचालक सहभागी झाले होते. आंदोलनात आॅटोरिक्षा चालकांसाठी समाज कल्याण बोर्डाचे गठन करावे, अवैध वाहतूक बंद करावी, आॅटो थांब्यांची संख्या वाढवून थांबे फलक लावावे, सहा महिन्याच्या वर लॅप्स झालेल्या परवान्यांचे त्वरित नूतनीकरण करावे, आॅटो चालकांना राहण्यासाठी घर द्यावे, मेट्रो रेल्वेच्या थांब्याजवळ आॅटो थांब्याची व्यवस्था करावी आदी मागण्या आंदोलनात रेटून धरण्यात आल्या. यशवंत स्टेडियम येथून दुपारी १ वाजता आॅटोचालकांचा भव्य मोर्चा कस्तुरचंद पार्ककडे निघाला. मोर्चा मुंजे चौक, व्हेरायटी चौक, संविधान चौक या मार्गाने कस्तुरचंद पार्कवर पोहोचला. मोर्चात सहभागी आॅटोचालकांनी विविध घोषणा देऊन आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. कस्तुरचंद पार्कवर मोर्चाचे एका सभेत रूपांतर होऊन तेथे आॅटोचालकांचे गंभीर प्रश्न मांडण्यात आले. त्यानंतर हरिश्चंद्र पवार, मोहन बावणे, भरत लांडगे, प्रिंस इंगोले, मेहबुब अहमद, नियाज अली यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांनी आॅटोचालकांच्या समस्यांसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक बोलविण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली. आॅटोचालकांच्या समस्या त्वरित दूर न केल्यास आंदोलन करून हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा आॅटोचालकांनी यावेळी दिला. (प्रतिनिधी)स्टार बस झाल्या फुल्ल
आॅटो बंदमुळे स्टार बसमधील गर्दी अचानक वाढली. अनेक जणांनी स्टार बसने प्रवास करून या संकटातून मार्ग काढला. यामुळे शहरातील विविध मार्गावरील स्टार बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली.
बसस्थानकावरील प्रवाशांचेही हाल
गणेशपेठच्या मध्यवर्ती बसस्थानकावर उतरल्यानंतर असंख्य आॅटोचालक संबंधित प्रवाशाजवळ येऊन आॅटो हवा आहे काय, याची चौकशी करतात. परंतु बुधवारी मात्र एकही आॅटोचालक दिसला नसल्यामुळे बसस्थानकावरील प्रवाशांचे हाल झाले. त्यांना आपले सामान घेऊन पायीच निघून जाण्याची पाळी आली.