नागपूर रेल्वेस्थानकाला घातला ऑटोचालकांनी विळखा :वाहतुकीचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 10:03 PM2019-04-29T22:03:27+5:302019-04-29T22:04:19+5:30
रेल्वेस्थानकाच्या परिसरात नेहमीच वर्दळ राहते. २४ तास प्रवाशांची ये-जा सुरू असते. परंतु रेल्वेस्थानकाच्या सर्वच रस्त्याला ऑटोचालकांनी विळखा घातल्याची स्थिती निर्माण झाली आहे. ऑटोचालकांना आतमध्ये जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी जागा उरत नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेस्थानकाच्या परिसरात नेहमीच वर्दळ राहते. २४ तास प्रवाशांची ये-जा सुरू असते. परंतु रेल्वेस्थानकाच्या सर्वच रस्त्याला ऑटोचालकांनी विळखा घातल्याची स्थिती निर्माण झाली आहे. ऑटोचालकांना आतमध्ये जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी जागा उरत नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
नागपूर रेल्वेस्थानकावर दिवसाकाठी १३५ ते १४५ रेल्वेगाड्या ये-जा करतात. प्रवाशांची संख्याही ३५ ते ४० हजार असते. परंतु रेल्वेस्थानकावर पूर्वेकडील संत्रा मार्केट परिसरात आणि पश्चिमेकडील भागात ऑटोचालकांनी रेल्वेस्थानकाला विळखा घातल्याची स्थिती आहे. यात ऑटोचालक भर रस्त्यात आपली वाहने उभी करीत असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. प्रवाशांना आतमध्ये जाताना आणि बाहेर पडताना जागा उरत नाही. प्रवाशी घेण्यासाठी हे ऑटोचालक रस्त्यात ऑटो उभे करून रेल्वेस्थानकाच्या आत प्रवासी शोधण्यासाठी जातात. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहने घेऊन रेल्वेस्थानकाच्या आत येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होते. त्यांना आतमध्ये जाताना आणि बाहेर पडताना त्रास होतो. या भागात नेहमीच वाहतूक विस्कळीत होते. अनेकदा शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने रस्त्यावरील ऑटोचालक, दुकानदार आदीविरुद्ध कारवाई करण्यात येते. परंतु पोलिसांचे वाहन निघून गेले की पुन्हा हे अतिक्रमण जैसे थे सुरू होते. त्यामुळे या परिसरातील ऑटोचालकांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
मुख्य रस्त्यावर अतिक्रमण
रेल्वेस्थानकाच्या आत जाण्यासाठी पश्चिमेकडील भागात दोन रस्ते आहेत. यात आरएमएस बिल्डिंग शेजारच्या रस्त्यावर ऑटोचालक दोन्ही बाजूंनी ऑटो उभे करतात. याशिवाय घड्याळ, मोबाईल कव्हर विक्रेते, पानटपरीवाले हे या रस्त्याच्या बाजूलाच उभे राहत असल्यामुुळे प्रवाशांना आत प्रवेश करताना जागा उरत नाहीत. त्यानंतर रेल्वेस्थानकाच्या वाहतूक बूथच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर तर ऑटोचालक ऑटो उभे करून हा रस्ताच बंद करून टाकत असल्याची स्थिती आहे. कार पार्किंगच्या शेजारी रेल्वेस्थानकाच्या बाहेर पडण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूलाही ऑटोचालक ऑटो उभे करून हा रस्ता बंद करून टाकतात.
मेन गेटमध्ये उभे राहतात ऑटोचालक
रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात प्रवाशांना प्रवेश करण्यासाठी असलेल्या मेन गेटचा ताबाही ऑटोचालकांनी घेतला आहे. या गेटच्या आतमध्ये आणि बाहेर ऑटोचालक प्रवाशी घेण्यासाठी उभे राहतात. त्यामुळे प्रवाशांना आतमध्ये जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी जागा उरत नसल्याची स्थिती आहे. याबाबत लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने ऑटोचालकांवर कारवाई होताना दिसत नसल्यामुळे ऑटोचालकांचे चांगलेच फावत आहे.
संत्रा मार्केट परिसरातही वाहतुकीचा खोळंबा
नागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील संत्रा मार्केट परिसरातही ऑटोचालकांनी अतिक्रमण केले आहे. या भागात प्रवेश करण्यासाठी असलेल्या आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर ऑटोचालक ऑटो उभे करीत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. रस्त्यावर ऑटो उभे राहत असल्यामुळे प्रवाशांना घाईगडबडीत रेल्वे पकडण्यासाठी जाताना त्रास होत आहे. त्यामुळे या भागात वाहतूक विस्कळीत करणाऱ्या ऑटोचालकांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
वाहतूक पोलिसांशी चर्चा करणार
‘रेल्वेस्थानकाच्या आत जाण्याच्या आणि बाहेर पडण्याच्या रस्त्यांवर ऑटोचालकांनी अतिक्रमण केल्यामुळे रेल्वे प्रवाशांना त्रास होत आहे. त्यामुळे या रस्त्यावर ऑटो उभे करणाऱ्या ऑटोचालकांचा बंदोबस्त करण्यासाठी शहर वाहतूक पोलीस उपायुक्तांना भेटून चर्चा करणार आहोत.’
भवानी शंकर नाथ, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल