ऑटोचालक व दिव्यांग व्यक्तीची अशीही श्रीमंती; दीड लाखांची रोकड केली परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 12:40 PM2022-03-07T12:40:57+5:302022-03-07T12:48:13+5:30

त्या दोघांनी नोटाने भरलेली ही बॅग घेऊन थेट पाचपावली पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी बॅगमधील कागदपत्रांच्या आधारे मेहबूब हसन यांचा शोध घेतला. त्यांना पोलीस ठाण्यात बोलविले आणि ती रक्कम व कागदपत्रे त्यांच्या हवाली केले.

auto rickshaw driver and a disabled passenger returned bag containing 1.50 lakhs found in the vehicle | ऑटोचालक व दिव्यांग व्यक्तीची अशीही श्रीमंती; दीड लाखांची रोकड केली परत

ऑटोचालक व दिव्यांग व्यक्तीची अशीही श्रीमंती; दीड लाखांची रोकड केली परत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ऑटोचालक इथले - तिथले सारखेच असतात, असे म्हणत ठिकठिकाणची मंडळी नाकतोंड मुरडतात. मात्र, उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने नागपुरातील ऑटोचालक आणि एका दिव्यांग तरुणाची मानसिक श्रीमंती बघितली. या दोघांनी दीड लाखांची रोकड पोलिसांच्या मदतीने त्या व्यक्तीला परत केली.

सुभाष पुंडलिक लाहुतरे (५०, रा. शेंडेनगर) आणि दिनेश आनंदराव ठवरे (४५, रा. महर्षी दयानंदनगर) अशी या प्रामाणिक व्यक्तींची नावे आहेत. दोघांचीही आर्थिक स्थिती बेताची आहे. लाहुतरे ऑटो (ई-रिक्षा) चालवितात. तर, ठवरे दिव्यांग आहेत. लाहुतरे यांच्या ऑटोत शनिवारी मेहबूब महमूद हसन (३४, रा. अजरारी मेरठ, उत्तर प्रदेश) हे मोमिनपुऱ्यातून चिटणीस पार्क येथे जाण्यासाठी बसले. घाईघाईत आपली दीड लाखांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग ऑटोत सोडून ते निघून गेले. त्यानंतर या ऑटोत ठवरे बसले. त्यांना आपल्या बाजूला बॅग दिसली. ठवरेंनी लाहुतरे यांना ती दाखवली. दोघींनी ती उघडली असता त्यात नोटा आढळल्या. या दोघांनी नोटाने भरलेली ही बॅग घेऊन थेट पाचपावली पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी बॅगमधील कागदपत्रांच्या आधारे मेहबूब हसन यांचा शोध घेतला. त्यांना पोलीस ठाण्यात बोलविले आणि ती रक्कम व कागदपत्रे त्यांच्या हवाली केले.

गदगद झाले हसन

शेकडो किलोमीटर दूर, अनोळखी शहरात पोलीस स्वत:हून आपल्याला संपर्क करतात अन् आपली रोकड परतही करतात, हे सर्व मेहबूब हसन यांच्यासाठी कल्पनेपेक्षा कमी नव्हते. पोलिसांनी रक्कम हातात ठेवताच ते गदगद झाले. त्यांनी लाहुतरे, ठवरे अन् पाचपावली पोलिसांचे आभार मानले.

पोलिसांकडून प्रामाणिकपणाचा सत्कार

हा प्रामाणिकपणा दाखविणारे ठवरे आणि लाहुतरे यांचा पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या हस्ते, सहायक आयुक्त सचिन थोरबोले यांच्या उपस्थितीत पाचपावलीचे ठाणेदार संजय मेंढे यांनी सत्कार केला.

Web Title: auto rickshaw driver and a disabled passenger returned bag containing 1.50 lakhs found in the vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.