नागपूर जिल्ह्यात भरधाव आॅटोरिक्षा उलटला; चिमुकलीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 10:43 AM2018-04-03T10:43:49+5:302018-04-03T10:43:56+5:30
भिवापूर तालुक्यातील नांद येथील पाच महिन्याच्या ‘माही’ला तिचे आईवडील घेऊन आॅटोने उमरेडला निघाले होते. हा आॅटो नांद बसस्टॉपजवळ दोन कि.मी अंतरावर जाताच चालकाचा ताबा सुटला आणि उलटला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: भिवापूर तालुक्यातील नांद येथील पाच महिन्याच्या ‘माही’ला नागपूर येथील हॉस्पिटलमध्ये नियमित वैद्यकीय तपासणीसाठी न्यावयाचे असल्याने तिचे आईवडील तिला घेऊन आॅटोने उमरेडला निघाले होते. हा आॅटो नांद बसस्टॉपजवळ दोन कि.मी अंतरावर जाताच चालकाचा ताबा सुटला आणि उलटला. त्यात माहीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिची रुग्णालयात उपचारासाठी नेताना वाटेतच प्राणज्योत मालवली. या अपघातात तिचे आईवडील किरकोळ जखमी झाले. ही दुर्दैवी घटना भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानकापूर (नांद) शिवारातील नागोबा मंदिराजवळ सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
माही ही अमोल रमेश खडसे (३५) व जयश्री अमोल खडसे (३०) रा. नांद, ता. भिवापूर यांची एकुलती एक कन्या होय. तिला सोमवारी नागपूर येथील डागा हॉस्पिटलमध्ये नियमित वैद्यकीय तपासणीसाठी न्यावयाचे असल्याने अमोल व जयश्री नांद बसस्टॉपवर बसची प्रतीक्षा करीत होते. बस न आल्याने त्यांनी एमएच-४०/१७४८ क्रमांकाच्या सहा आसनी आॅटोन उमरेडला जाण्याचा निर्णय घेतला. आॅटोत या तिघांशिवाय अन्य प्रवासी नव्हता. हा आॅटो बसस्टॉपपासून दोन कि.मी. अंतरावर जाताच चालक संदीप ऊर्फ बबलू प्रभाकर फेजदवार (३५) याचा आॅटोवरील ताबा सुटला आणि भरधाव आॅटो उलटला. त्यात माहीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, तिचे आईवडील किरकोळ जखमी झाले. संदीपला मात्र काहीही दुखापत झाली नाही. तिघांनी उलटलेला आॅटो सरळ केला आणि लगेच नांद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.
आॅटोचालक दारूच्या नशेत
माही ही खडसे दाम्पत्याची एकुलती एक कन्या असून, लग्नानंतर सहा वर्षांनी तिचा जन्म झाला होता. दुसरीकडे, संदीप फेजदवार याने शेती विकून मिळालेल्या पैशातून १५ दिवसांपूर्वीच आॅटो विकत घेतला होता. सोमवारी बस बंद असल्याने त्याने पहिल्यांदाच आॅटो प्रवासी नेण्यासाठी घराबाहेर काढला होता. त्यातच तो दारू प्यायलेला होता. अपघातानंतर उलटलेला आॅटो सरळ करून त्याने घर गाठले. घराकडे जाताना वाटेतील चुटे यांच्या घरासमोर ठेवलेल्या पलंगाला आॅटोने धडक दिली. एवढेच नव्हे तर, त्याने स्थानिक नागरिक व पोलिसांशी वाद घातला होता.