ओला, उबेरविरोधात आॅटोचालकांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 11:00 PM2018-04-03T23:00:05+5:302018-04-03T23:00:16+5:30
राजकारणी आणि प्रशासनाचा वरदहस्त लाभल्याने ओला, उबेर या कंपन्यांची प्रवासी वाहतूक शहरात बेकायदेशीरपणे सुरू असल्याचा आरोप आॅटो चालक-मालक संघटनेने केला आहे. ओला, उबेरच्या प्रवासी वाहतुकीमुळे आॅटोचालकांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचा आरोप करीत संघटनेतर्फे या कंपन्यांविरोधात मंगळवारी निदर्शने करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राजकारणी आणि प्रशासनाचा वरदहस्त लाभल्याने ओला, उबेर या कंपन्यांची प्रवासी वाहतूक शहरात बेकायदेशीरपणे सुरू असल्याचा आरोप आॅटो चालक-मालक संघटनेने केला आहे. ओला, उबेरच्या प्रवासी वाहतुकीमुळे आॅटोचालकांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचा आरोप करीत संघटनेतर्फे या कंपन्यांविरोधात मंगळवारी निदर्शने करण्यात आली.
संघटनेचे अध्यक्ष नितीन सोळंके यांच्या नेतृत्वात सुभाषनगर टी-पॉर्इंटवर ओला कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते, मात्र त्यांच्याकडून दखल न घेतल्यामुळे आंदोलन करावे लागत असल्याचे सोळंके यांनी सांगितले. आॅटोचालकांना कायदेशीर परवाना घेणे, युनिफॉर्म वापरणे असे अनेक नियम लागू आहेत, मात्र यातील कुठलेही नियम ओला, उबेर कंपन्यांसाठी नाहीत. तरीही आरटीओ अधिकाऱ्यांद्वारे यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे या कंपन्यांचा व्यवसाय भरात असून आॅटोचालकांवर मात्र व्यवसाय बंद करण्याची वेळ आली असल्याचा आरोप त्यांनी केला. शेकडो कोटींचा महसूल बुडविणाऱ्या ओला, उबेरवर आणि आरटीओच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, आॅटोचालकांप्रमाणे ओला, उबेर चालकांना बॅच बिल्ला लागू करण्यात यावा, आॅटोप्रमाणे या प्रवासी वाहनांचेही भाडे निर्धारित करावे, नोंदणी नसलेल्या प्रवासी वाहनांवर कारवाई करण्यात यावी, आदी मागण्या संघटनेने ठेवल्या. आंदोलनात संघटनेचे उपाध्यक्ष प्रतीक बालपांडे, अॅड. नितीन रुडे, सचिव अविनाश जनबंधू, नियाज अली, नीलेश तिघरे, गणेश सोळंके, बंटी बोरीकर आदींचा सहभाग होता.