ऑटोचालकाला मंत्री केले, आणखी काय हवे ! चंद्रशेखर बावनकुळे यांची भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 10:13 PM2019-10-04T22:13:59+5:302019-10-04T22:43:18+5:30
एका सामान्य ऑटोचालकाला जि.प. सदस्य, आमदार आणि मंत्री बनविले. भारतीय जनता पक्षाचे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका सामान्य ऑटोचालकाला जि.प. सदस्य, आमदार आणि मंत्री बनविले. हे पक्षाने माझ्यावर केलेले उपकार आहेत. शेतमजुरी करणाऱ्या, किराणा दुकानात काम करणाऱ्या मजुराला त्याच्या आयुष्यात एवढे सारे काही मिळायला नशीब लागते, खऱ्या अर्थाने मी नशीबवानच आहे. भारतीय जनता पक्षाचे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
कामठी विधानसभा मतदार संघासाठी भाजपने यावेळी आपल्याला संधी नाकारली, याबाबत माझी कोणतीही नाराजी नाही. पक्षाने मला याच मतदार संघातून तीनवेळा आमदार केले. दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री केले. पक्षश्रेष्ठीने जो निर्णय घेतला तो मान्य आहे. मी विदर्भात पक्षासाठी काम करावे अशी पक्षश्रेष्ठींची इच्छा आहे. त्यामुळे नाराज असण्याचे काहीही कारण नाही. काटोल हा माझ्यासाठी पर्याय होता. मात्र मी तिथून लढलो असतो तर तेथील कार्यकर्त्यावर अन्याय झाला असता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला माझ्या मोठ्या भावासारखे तर नितीन गडकरी वडिलांसारखे आहेत. त्यांच्या नेतृत्वात मला काम करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या स्वप्नपूर्तीसाठी सामान्य कार्यकर्ता म्हणून यापुढेही मी काम करीत राहणार आहे. पक्ष देईल ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेल, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
पूर्व विदर्भात विधानसभा निवडणुकीत मला काम करता येईल, त्यामुळे मला पक्षाने उमेदवारी दिली नाही. माझ्या पत्नीने अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला नाही, त्याला एबी फार्म नसल्यामुळे तो तसाही बाद होणारच होता, असेही बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.