लक्ष्मीनारायण तंत्र संस्थेला यूजीसीचा स्वायत्त दर्जा; विद्यापीठाचा सामंजस्य करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2023 06:51 PM2023-07-07T18:51:09+5:302023-07-07T18:51:51+5:30
Nagpur News लक्ष्मीनारायण तंत्र संस्थेला (एलआयटी) दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाने स्वायत्त दर्जा प्रदान केला आहे.
नागपूर : लक्ष्मीनारायण तंत्र संस्थेला (एलआयटी) दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाने स्वायत्त दर्जा प्रदान केला आहे. याबाबत पत्र देत विद्यापीठ अनुदान आयोगाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूरला कळविले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगा (यूजीसी) ने स्वायत्त दर्जा प्रदान केल्याने एलआयटीला आणखी एक बहुमान प्राप्त झाला आहे.
स्वायत्त दर्जा प्राप्त करण्याकरिता विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी आधी लक्ष्मीनारायण तंत्र संस्थेचे (एलआयटी) पहिल्यांदा नॅक (NAAC) करवून घेतले. त्यात एलआयटीला ए प्लस (A+) दर्जा मिळवून दिला. एलआयटीच्या कार्यकाळातील ही पहिलीच नॅक ( NAAC) व्हिजीट होती. नॅक (NAAC) चा ए प्लस (A+) दर्जा प्राप्त होताच दिनांक २२ सप्टेंबर २०२२ रोजी स्वायत्त दर्जा प्राप्त करण्याकरिता प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्या बरोबरच एलआयटीच्या एनबीए (NBA) मूल्यांकनाकरिता प्रस्ताव पाठवण्यात आला होता. नुकताच एनबीए (NBA) दर्जा सुद्धा एलआयटीला प्राप्त झालेला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्न लक्ष्मीनारायण तंत्र संस्थेने स्वायत्त दर्जा प्राप्त व्हावा म्हणून दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाकडे दिनांक २२ सप्टेंबर २०२२ रोजी प्रस्ताव पाठविला होता. विद्यापीठ अनुदान आयोगाने २७ जून २०२३ रोजी झालेल्या बैठकीत स्वायत्त महाविद्यालयांबाबत असलेल्या स्थायी समितीने केलेल्या शिफारसी मान्य केल्या. स्थायी समितीने केलेल्या शिफारसीनुसार दहा वर्षाच्या कालावधी करिता यूजीसी कलम ७.५ (महाविद्यालयांना स्वायत्त दर्जा प्रदान करणे आणि स्वायत्त महाविद्यालयांमध्ये दर्जा राखण्यासाठी उपाययोजना) अंतर्गत २०२३-२४ ते २०३२-२०३३ या शैक्षणिक सत्राकरिता ही स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे स्वायत्त महाविद्यालयांसाठी असलेल्या नियमांच्या सर्व तरतुदींचे एलआयटीला पालन करावे लागणार आहेत.
यूजीसीचा एलआयटीला स्वायत्त दर्जा
विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांनी लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला स्वायत्त दर्जा प्रदान केला आहे. ही आमच्याकरिता आनंदाची बाब आहे. याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी व विद्यापीठाच्या सर्व अधिकाऱ्यांचे सतत सहकार्य आणि प्रोत्साहन लाभले आहे. LITAA आणि आमचे प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानतो.
डॉ. राजू मानकर, संचालक लक्ष्मीनारायण तंत्र संस्था