ऑटोचालकांचा संप मागे : मुख्यमंत्र्यांनी बोलवली बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 11:40 PM2019-07-08T23:40:44+5:302019-07-08T23:41:31+5:30
ऑटोरिक्षा चालकांसाठी परिवहन विभागामार्फत स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करा, या मुख्य मागणीसाठी ऑटोरिक्षा चालक मालक संघटना, संयुक्त कृती समितीच्यावतीने राज्यभरातील ऑटोचालक ९ जुलैपासून बेमुदत संपावर जाणार होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी मागण्यांना घेऊन मंगळवारी बैठकीसाठी बोलविल्याने तुर्तास संप मागे घेण्यात आला. परंतु हा निर्णय रात्री उशीरा घेण्यात आल्याने सकाळी ऑटोतून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :ऑटोरिक्षा चालकांसाठी परिवहन विभागामार्फत स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करा, या मुख्य मागणीसाठी ऑटोरिक्षा चालक मालक संघटना, संयुक्त कृती समितीच्यावतीने राज्यभरातील ऑटोचालक ९ जुलैपासून बेमुदत संपावर जाणार होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी मागण्यांना घेऊन मंगळवारी बैठकीसाठी बोलविल्याने तुर्तास संप मागे घेण्यात आला. परंतु हा निर्णय रात्री उशीरा घेण्यात आल्याने सकाळी ऑटोतून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
कृती समितीच्या वतीने मागील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना मागण्यांचे निवदेन देण्यात आले होते. ३० जूनपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास ९ जुलैपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही दिला होता. विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनचे विलास भालेकर म्हणाले, बेमुदत आंदोलनामध्ये शहरातील टाइगर ऑटोरिक्षा संघटना, सक्रिय ऑटोरिक्षा समिती, लोकसेवा प्रीपेड सेवा संस्था रेल्वे स्टेशन, आदी संस्था सहभागी होणार होत्या. फेडरेशनच्यावतीने मंगळवारी दुपारी १२ वाजतापासून संविधान चौकात मूक धरणे आंदोलन केले जाणार होते. या आंदोलनात नागपूर जिल्ह्यात ८० ते ९० टक्के ऑटोचालक सहभागी होणार होते. परंतु मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी ३ वाजता बैठक आयोजित करण्यात आल्याचे पत्र समितीला प्राप्त झाले. यामुळे संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याची माहिती ऑटोचालकांपर्यंत पोहचविली जात आहे. सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्याऑटोचालकांनाही याची माहिती देण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रयत्न सुरू आहेत.