नागपुरात ऑटोरिक्षाचा प्रवास बुधवार मध्यरात्रीपासून महागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2022 08:15 AM2022-06-15T08:15:00+5:302022-06-15T08:15:01+5:30
Nagpur News पेट्रोलची दरवाढ, ऑटोरिक्षाचा विम्याचा हप्ता, मोटार वाहन कर आदी कारणे पुढे करीत प्रादेशिक परिवहन प्राधिकरण नागपूरने ऑटोरिक्षा भाड्यामध्ये दरवाढ केली.
नागपूर : पेट्रोलची दरवाढ, ऑटोरिक्षाचा विम्याचा हप्ता, मोटार वाहन कर आदी कारणे पुढे करीत प्रादेशिक परिवहन प्राधिकरण नागपूरने ऑटोरिक्षा भाड्यामध्ये दरवाढ केली. यापुढे प्रतिकिलोमीटरसाठी १८, तर दीड किलोमीटरसाठी २७ रुपये मोजावे लागणार आहेत. ही वाढ उद्या, बुधवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने २० ऑगस्ट २०१४ रोजी ऑटोरिक्षाकरिता प्रतिकिमीकरिता १४ रुपये भाडेदर ठरविले होते. दरम्यानच्या काळात वाढलेल्या पेट्रोलच्या दरासह ऑटोरिक्षाचालकांना द्यावा लागणारा कर आदी बाबी विचारात घेऊन खटुआ समितीने ९ मार्च २०२० रोजी ऑटोरिक्षा भाडे निश्चितीची परिगणना केली. त्या अनुषंगाने ६ जून २०२० रोजी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, नागपूरने तीन आसनी सीएनजी किंवा पेट्रोल इंधन वापरणाऱ्या ऑटोरिक्षांकरिता सुधारित सरासरी भाडेदराला मंजुरी दिली. ‘शेअर-ए-रिक्षा’ व ‘प्रीपेड’ योजनेत सहभागी असलेल्या ऑटोरिक्षांना ही दरवाढ लागू असणार आहे.
-‘मीटर कॅलिब्रेशन’साठी ६० दिवसांची मुदत
१६ जूनपासून प्रवासी भाड्यात दरवाढ होणार असल्याने ऑटोरिक्षांचे ‘मीटर कॅलिब्रेशन’ करण्यासाठी ६० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
..तर परवाना निलंबित
‘मीटर कॅलिब्रेशन’ मुदतीत करून न घेतल्यास प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी १ दिवस परवाना निलंबन केला जाईल. कमीत कमी सात दिवसांसाठी तर जास्तीत जास्त ४० दिवसांसाठी हे निलंबन राहणार आहे.
- तडजोड शुल्क दिवसाला ५० रुपये
मुदत संपल्यानंतर होणाऱ्या कारवाईत निलंबनाऐवजी तडजोड शुल्क म्हणून दिवसाला ५० रुपये असणार आहे. यात कमीत कमी ५००, तर जास्तीत दोन हजार रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
ऑटोरिक्षा संघटना व ग्राहक पंचायत यांची बैठक घेऊन या भाडे दरवाढीवर बैठक घेण्यात आली. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या निर्णयानुसार भाडे दरवाढ करण्यात आली. यासाठी ऑटोरिक्षाच्या ‘मीटर कॅलिब्रेशन’साठी ६० दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर तपासणी मोहीम सुरू करून दोषींवर कारवाई केली जाईल.
-रवींद्र भुयार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर
- आमची मागणी होती २० ते २२ रुपये प्रतिकिमीची
ऑटोरिक्षा संघटनेची प्रतिकिमीनुसार २० ते २२ रुपयांची भाडे दरवाढीची मागणी होती. पेट्रोल व सीएनजीचे दर पाहता ही फार कमी दरवाढ आहे. यातच आपल्याकडे एक किलोमीटरचा टप्पा असतो. परंतु पुणे, मुंबईच्या धर्तीवर दीड किलोमीटरचा टप्पा लादण्यात आला आहे. यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता आहे.
-विलास भालेकर, विदर्भ ऑटोरिक्षाचालक फेडरेशन