ऑटोरिक्षांना ग्राहकांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:10 AM2021-02-28T04:10:19+5:302021-02-28T04:10:19+5:30
नागपूर : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाने महानगरात लागू केलेल्या दोन दिवसाच्या शिथिलतेचा परिणाम शहरातील ऑटोरिक्षांच्या सेवेवर झाला. दोन ते ...
नागपूर : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाने महानगरात लागू केलेल्या दोन दिवसाच्या शिथिलतेचा परिणाम शहरातील ऑटोरिक्षांच्या सेवेवर झाला. दोन ते पाच टक्के ऑटोरिक्षा आज सेवेत असले तरी प्रवाशीच नसल्याने बहुतेक ऑटोचालकांना दिवसभर ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागली.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने बाजार बंद ठेवण्याचे आदेश काढल्यानंतर शहरातील बहुतेक बाजारपेठा आणि व्यवसाय शनिवारी बंद होते. अत्यावश्यक सेवा आणि बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाची आणि खासगी प्रवासी वाहतूकदारांची सेवा दिवसभर सुरू असली तरी फेऱ्या मात्र बऱ्याच कमी करण्यात आल्या होत्या. प्रवासीही कमी होते. रुग्णालयाची सेवा सुरू होती. त्यामुळे महत्त्वाच्या कामानिमित्त शहरात आलेल्या नागिरकांना ऑटोरिक्षांची सेवा देता आली. शहरातील नागरिक फारसे रस्त्यावर नसल्याने आणि गर्दी कमी असल्याने अनेक चौकांमध्ये आणि ऑटोस्टॅन्डवर चालकांची ग्राहकांसाठी प्रतीक्षा कायम असलेली दिसली. शहरामध्ये जवळपास २५ हजार ऑटोरिक्षा आहेत. शनिवारी मोजके ऑटो सेवेत दिसले. एरवि भरभरून धावणारे ऑटोरिक्षा ग्राहक नसल्याने उभे होते. काही ठिकाणी ऑटोचालकांनी नेहमीपेक्षा अधिक दराची आकारणी केली. सकाळच्या सत्रात शहरात धावणाऱ्या ऑटोरिक्षांची संख्या दुपारनंतर बरीच कमी झालेली दिसली.
रामदासपेठ आणि धंतोली हा गजबजलेला परिसर असतो. या परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्णालये असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी असते. परंतु शनिवारी हा परिसर ओस पडलेला जाणवला. बसस्थानकाचा परिसरही या व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. मात्र बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची संख्या दुपारनंतर बरीच मंदावली. त्याचा परिणाम ऑटोचालकांच्या व्यवसायावर चांगलाच पडला.
...
५ टक्केही व्यवसाय नाही
झाशी राणी चौक ऑटो युनियनचे अध्यक्ष महेश इखार म्हणाले, सकाळपासून ५ टक्केही व्यवसाय झाला नाही. सीताबर्डी आणि बसस्थानक चौक व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे असले तरी प्रवाशीच नसल्याने प्रतीक्षा करावी लागली. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांना आम्ही नेहमी सहकार्यच केले आहे. मात्र भविष्यात दीर्घकाळ लॉकडाऊन लावले गेल्यास आमच्या समस्यांचा सरकारने विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नितीन गवई हा युवा ऑटोरिक्षा चालक म्हणाला, सकाळपासूनच व्यवसायावर परिणाम जाणवत आहे. बाहेरगावचे प्रवासी, रुग्ण, गरजू यांच्यासाठी आमची सेवा आज महत्त्वाची ठरत आहे.
...