काँग्रेसच्या गटनेतेपदी अवंतिका लेकुरवाळे; विरोधी व सत्तेतील सहकारी पक्षाचा गटनेता ठरेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 10:29 AM2021-10-28T10:29:05+5:302021-10-28T10:34:16+5:30
अवंतिका लेकुरवाळे ह्या कामठी तालुक्यातील वडोदा सर्कलच्या सदस्य आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अपात्र ठरलेल्या १६ सदस्यांपैकी लेकुरवाळे ह्यादेखील एक होत्या.
नागपूर :जिल्हा परिषदेत काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांची निवड निवड करण्यात आली. काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांपुढे नोंदणीची औपचारीकता पूर्ण केली.
बुधवारी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्याही गटनेत्याची निवड होण्याची शक्यता होती. परंतु भाजप आणि राष्ट्रवादीच्या गोटातून कुणाचेही नाव जाहीर करण्यात आले नाही. भाजपमध्ये गटनेत्यासाठी रस्सीखेच असून वरिष्ठांनी गटनेत्याची निवड प्रलंबित ठेवली असल्याची चर्चा आहे.
काँग्रेसच्या गटनेत्यापदी ज्येष्ठ सदस्यांसह नवीन सदस्यांच्याही नावाची चर्चा होती. अध्यक्ष आणि उपाध्यक्षासह काँग्रेसच्या गोटात दोन महिला सभापतिदेखील आहे. त्यामुळे गटनेता पुरुष सदस्य होईल, अशी शक्यता व्यक्त होत होती. तसे जिल्हा परिषदेच्या इतिहासात सत्तापक्षाच्या गटनेतेपदी पुरुष सदस्यांनाच संधी दिली जात होती. परंतु यंदा काँग्रेसने महिला सदस्याची गटनेतेपदावर नियुक्ती करून महिलांना प्रतिनिधीत्व दिले आहे.
अवंतिका लेकुरवाळे ह्या कामठी तालुक्यातील वडोदा सर्कलच्या सदस्य आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अपात्र ठरलेल्या १६ सदस्यांपैकी लेकुरवाळे ह्यादेखील एक होत्या. सार्वत्रिक निवडणुकीबरोबरच त्यांनी पोटनिवडणुकीतही रेकॉर्ड मते घेतली. त्यांचे अभ्यासू व्यक्तिमत्त्व, उत्तम वक्तृत्व शैली आणि हजरजबाबीपणा जिल्हा परिषदेच्या बैठकीदरम्यान दिसून आला होता. त्यांच्या या गुणांमुळे पहिल्यांदाच जिल्हा परिषदेत पदार्पण केल्यानंतरही त्यांच्याहाती पक्षाने गटनेत्याची धुरा सोपविली आहे.
बुधवारी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ग्रामीण कार्यालयात मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत गटनेता निवडीसाठी बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, जि. प. च्या अध्यक्ष रश्मी बर्वे, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, सुरेश भोयर, मनोहर कुंभारे, सभापती भारती पाटील, नेमावली माटे, उपस्थित होते. या बैठकीत एकमताने त्यांची निवड करण्यात आली.