मेयो इस्पितळात महिन्याला सरासरी १७२ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 06:56 PM2019-09-03T18:56:36+5:302019-09-03T18:58:47+5:30

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच ‘मेयो’ इस्पितळात २०१६ सालापासून तीन वर्षांत सहा हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली. दर महिन्याच्या हिशेबाने मृत्यूची संख्या सरासरी १७२ इतकी आहे.

On average 172 deaths a month at Mayo Hospital | मेयो इस्पितळात महिन्याला सरासरी १७२ मृत्यू

मेयो इस्पितळात महिन्याला सरासरी १७२ मृत्यू

Next
ठळक मुद्देतीन वर्षांत सहा हजारांहून अधिक मृत्यूची नोंद : २० लाखांहून अधिक रुग्णांनी घेतले उपचार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच ‘मेयो’ इस्पितळात २०१६ सालापासून तीन वर्षांत सहा हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली. दर महिन्याच्या हिशेबाने मृत्यूची संख्या सरासरी १७२ इतकी आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे माहितीच्या अधिकारात विचारणा केली होती. १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत ‘मेयो’ इस्पितळाच्या आंतररुग्ण व बाह्यरुग्ण विभागात किती रुग्ण आले, यातील किती रुग्णांचा मृत्यू झाला,औषधांवर किती खर्च झाला, पाच लाखांहून अधिक किमतीची किती यंत्रे नादुरुस्त आहेत, याबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत ‘मेयो’च्या बाह्यरुग्ण विभागात २० लाख ४४ हजार ३० तर आंतररुग्ण विभागात १ लाख १४ हजार ७४१ रुग्ण आले. यापैकी ६ हजार २०० रुग्णांचा मृत्यू झाला. २०१६ मध्ये २ हजार १२ तर २०१७ मध्ये १ हजार ९८३ रुग्णांचा मृत्यू झाला. २०१८ मध्ये सर्वाधिक २ हजार २०५ मृत्यूंची नोंद झाली.
रुग्णांची आकडेवारी
वर्ष       बाह्यरुग्ण विभाग                 आंतररुग्ण विभाग              मृत्यू
२०१६   ६,८१,४२४                          ३५,२८५                           २,०१२
२०१७   ६,९८,८०१                          ३७,९३१                            १,९८३
२०१८    ६,६३,८०५                         ४१,५२५                          २,२०५

सव्वा कोटींहून अधिकची यंत्रसामुग्री नादुरुस्त
प्राप्त माहितीनुसार, ‘मेयो’मध्ये १ कोटी ४१ लाख २४ हजार ४२२ रुपयांची यंत्रसामुग्री नादुरुस्त आहे. यातील ‘एबीजी’च्या (१७ लाख ५६ हजार) दुरुस्तीसाठी कुठलाच उपाय नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय ‘एबीजी विथ इलेक्ट्रोलाईट अ‍ॅनालिसिस’, ‘स्पेस वर्क स्टेशन-४ सिरिंज इन्फ्युजन पंप्स’, ‘वेन्टिलेटर वेला डायमंड’, ‘टू डी कलर डॉप्लर’ हे यंत्रदेखील नादुरुस्त आहेत.

 

Web Title: On average 172 deaths a month at Mayo Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.