नागपुरातील सरासरी मतदान साठ टक्क्यांच्या खालीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:53 AM2019-03-15T10:53:50+5:302019-03-15T10:55:23+5:30

निवडणुकांना लोकशाहीचा उत्सव असे मानण्यात येते व मतदार याच्यात केंद्रबिंदू असतो. मात्र मतदानासंदर्भात मतदारांमध्ये उदासीनताच असल्याचे चित्र मागील ६७ वर्षांत दिसून आले आहे.

The average voting percentage in Nagpur is below 60 percent | नागपुरातील सरासरी मतदान साठ टक्क्यांच्या खालीच

नागपुरातील सरासरी मतदान साठ टक्क्यांच्या खालीच

googlenewsNext
ठळक मुद्दे१९६२ साली झाले सर्वाधिक ६८ टक्के मतदान मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान

योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणुकांना लोकशाहीचा उत्सव असे मानण्यात येते व मतदार याच्यात केंद्रबिंदू असतो. मात्र मतदानासंदर्भात मतदारांमध्ये उदासीनताच असल्याचे चित्र मागील ६७ वर्षांत दिसून आले आहे. नागपुरात १६ लोकसभा निवडणुकांमध्ये एकदाही मतदानाची टक्केवारी सत्तरी पार गेलेली नाही. तर सरासरी मतदान हे ५७ टक्क्यांच्या आसपासच राहिले आहे. अशा स्थितीत यंदा तरी मतदानाची टक्केवारी वाढणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नागपुरात १९५२ साली पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक पार पडली. यात मतदानाची टक्केवारी ही ५९.५३ टक्के इतकी होती. त्याकाळी निवडणूक आयोगाकडे मर्यादित साधने होती. मात्र तरीदेखील मतदानाची टक्केवारी हळूहळू वाढत गेली. १९६२ साली तर सर्वाधिक ६८.७ टक्के मतदान झाले होते. १९७१ ची निवडणूक वगळता १९६२ ते १९८९ या कालावधीतील सर्व निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी ही ६० टक्क्यांहून अधिक होती. मात्र त्यानंतर मतदानाचे प्रमाण खालावत गेले. मतदान जनजागृतीवर आयोगाने अधिक भर दिला, मात्र अनेक मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली.
१९९१ साली ४८.५५ टक्केच मतदान झाले. तर २००९ मध्ये मतदानाचा आकडा हा सर्वात कमी म्हणजे ४३.४० टक्के इतकाच होता. १९९१ नंतर सर्वाधिक मतदान २०१४ च्या निवडणुकांत झाले. मतदानाची टक्केवारी ही ५७.१२ टक्के इतकी होती. आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांचे एकूण सरासरी मतदान ५७.६७ टक्के इतके होते.

पाच वेळा विजयी उमेदवाराला अर्ध्याहून अधिक मते
दरम्यान, मागील १६ लोकसभा निवडणुकांत नागपूर मतदारसंघामध्ये विजयी उमेदवारांची एकूण मते ही नेहमी ३५ टक्क्यांहून अधिक राहिली आहेत. १९९८ साली कॉंग्रेसचे विलास मुत्तेमवार यांना सर्वाधिक ५७.४१ टक्के मते मिळाली होती. तर १९६७ साली कॉंग्रेसचे देवघरे यांना ३६.६ टक्के मते मिळाली होती. १९८०, १९८४, १९९८, १९९९ व २०१४ साली विजयी उमेदवारांना ५० टक्क्यांहून अधिक मते प्राप्त झाली.

Web Title: The average voting percentage in Nagpur is below 60 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Votingमतदान