अविनाश भुते गजाआड
By admin | Published: January 5, 2016 03:12 AM2016-01-05T03:12:45+5:302016-01-05T03:12:45+5:30
हजारो गुंतवणूकदारांचे शेकडो कोटी रुपये हडप करणारा महाठग प्रशांत वासनकर याची संगत ताजश्री समूहाचे संचालक
आर्थिक घोटाळा : महाठग वासनकरची संगत भोवली
नागपूर : हजारो गुंतवणूकदारांचे शेकडो कोटी रुपये हडप करणारा महाठग प्रशांत वासनकर याची संगत ताजश्री समूहाचे संचालक अविनाश भुते यांना भोवली. वासनकरचे लाभार्थी असल्याच्या आरोपावरून गुन्हेशाखेच्या पथकाने मंगळवारी भुतेंना अटक केली.
वासनकरचा घोटाळा ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर पोलिसांकडून चौकशीचे गुऱ्हाळ सुरू झाले. प्रदीर्घ चौकशीनंतर आर्थिक गुन्हे विभागाच्या पथकाने वासनकर आणि त्याच्या नातेवाईकांसह साथीदारांच्याही मुसक्या बांधल्या. या प्रकरणाच्या चौकशीच्या पुढच्या टप्प्यात वासनकरच्या लाभार्थ्यांची सप्रमाण यादी पोलिसांना मिळाली. त्यातील अविनाश भुते आणि चावला तसेच राठी या दोघांवर पोलिसांनी चौकशीचा फास टाकला. भुतेंच्या खात्यात ९ कोटी २० लाख रुपये तसेच चावला आणि राठीकडेही लाखोंची रक्कम वळती झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्यांची विचारपूस सुरू केली. चावला आणि राठीने लगेच रक्कम भरण्याची तयारी दाखवली. तर, भुते मात्र टाळाटाळ करू लागले. व्याजासह १३ कोटी ५० लाख रुपये पोलिसांना वसुल करायचे असल्यामुळे भुतेंच्या ताजश्री समूहाशी संबंधित प्रतिष्ठानांवर धाडी घालण्यात आल्या. एमआयडीसीच्या गोदामातील काही कारही पोलिसांनी जप्त केल्या. दबाव निर्माण झाल्याने भुतेंनी आपण सर्वच्या सर्व रक्कम जमा करायला तयार असल्याचे सांगून आपल्याला काही अवधी देण्यात यावा, अशी विनंती केली. कोर्टातही तसे सांगितले. नंतर मात्र घुमजाव केले. भुतेंनी कोर्टात घुमजाव करूनही पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी चुप्पी साधल्यामुळे चौकशी करणारे पोलिसच संशयाच्या भोवऱ्यात सापडले. पोलिसांवर आरोपही होऊ लागले. दरम्यान, वरिष्ठ पातळीवर या प्रकरणात पाणी मुरल्याची चर्चा झाल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा झाली. या पार्श्वभूमीवर ध्यानीमनी नसताना मंगळवारी गुन्हेशाखेच्या पथकाने अविनाश भुते यांना अटक केली.(प्रतिनिधी)