अविनाश गावंडे नागपूर मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 11:36 AM2019-11-08T11:36:05+5:302019-11-08T11:36:30+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) वैद्यकीय अधीक्षकपदाची जबाबदारी जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक व बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांच्याकडे गुरुवारी सोपविण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) वैद्यकीय अधीक्षकपदाची जबाबदारी जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक व बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांच्याकडे गुरुवारी सोपविण्यात आली. त्यांच्या अनुभवाचा फायदा रुग्णसेवेला व रुग्णालयाच्या कार्यपद्धतीला गती देण्यासाठी होईल, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.
आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रुग्णालय म्हणून नागपूर मेडिकलची नोंद आहे. येथे विदर्भच नाही तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आदी राज्यातून रोज शेकडो रुग्ण येतात. रुग्णसेवेपासून ते इतर प्रशासकीय जबाबदारीचा भार वैद्यकीय अधीक्षकांवर असतो. अधीक्षकपद एका वर्षासाठी असले तरी अनेक वरिष्ठ अधिकारी ही जबाबदारी घेण्यास टाळतात. तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश गोसावाी २०१७ पासून या पदावर कार्यरत होते. डॉ. गोसावी यांच्याकडे औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या प्रमुखाची जबाबदारी येताच त्यांनी अधीक्षकपदाच्या जबाबदारीपासून मुक्त करण्याचे पत्र दिले होते. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी ७ नोव्हेंबर रोजी डॉ. अविनाश गावंडे यांची वैद्यकीय अधीक्षक पदाच्या नियुक्तीचे पत्र काढले. डॉ. गावंडे यांच्यावर जेव्हा जेव्हा मेडिकल प्रशासनाने कामाची जबाबदारी टाकली तेव्हा तेव्हा त्यांनी ती यशस्वी पूर्ण केली. त्यांच्याकडे यापूर्वी अभिलेखागार विभाग, सामाजिक सेवा अधीक्षक विभाग, शहरी आरोग्य प्रशिक्षण केंद्र व सावनेर येथील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्राची जबाबदारी होती. त्यांनी येथे आपल्या कामाची छाप पाडल्याने या विभागात बरीच सुधारणा झाली. त्यांना असलेल्या कार्याचा अनुभव लक्षात घेऊनच डॉ. मित्रा यांनी त्यांची वैद्यकीय अधीक्षक पदासाठी निवड केली. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. गावंडे म्हणाले, मेडिकलमध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. येथे आलेल्या प्रत्येक रुग्णाला कसे तातडीने उपचार मिळतील याकडे लक्ष दिले जाईल. शिवाय, रुग्णालयाच्या कार्यपद्धतीत आणखी गती आणण्यासाठी नियोजन केले जाणार आहे. रुग्णालयाच्या स्वच्छतेला प्राधान्य दिले जाईल, असेही ते म्हणाले.