अविनाश वारजूकरांना तात्पुरता दिलासा
By admin | Published: March 9, 2017 02:37 AM2017-03-09T02:37:59+5:302017-03-09T02:37:59+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी काँग्रेसचे चिमूर येथील माजी आमदार
हायकोर्ट : वैद्यकीय उपचारासाठी नागपूर प्रवेशाची अनुमती
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी काँग्रेसचे चिमूर येथील माजी आमदार अविनाश वारजूकर यांना धंतोलीतील एका रुग्णालयात उपचार घेण्यासाठी ७ दिवस नागपुरात राहण्याची परवानगी दिली. धंतोली पोलीस ठाण्यात रोज हजेरी नोंदविण्याच्या अटीवर ही परवानगी देण्यात आली. तसेच, त्यांना येत्या १७ मार्च रोजी उपचारासंदर्भातील कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यास सांगण्यात आले.
प्रकरणावर न्यायमूर्ती प्रदीप देशमुख यांच्यासमक्ष सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने २८ सप्टेंबर २०१६ रोजी वारजूकर यांना बलात्कार प्रकरणात सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या निर्णयातील एका अटीनुसार वारजूकर यांना सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होतपर्यंत नागपुरात राहण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यावेळी न्यायालयात उपस्थित तपास अधिकाऱ्याने एक महिन्यात दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल अशी माहिती दिली होती. परंतु, अद्यापही दोषारोपपत्र दाखल करण्यात आले नाही. परिणामी वारजूकर यांनी नागपुरात प्रवेश करण्याची व राहण्याची परवानगी मिळावी यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. आरोग्य तपासणीसह विविध कारणांसाठी नागपुरात येणे गरजेचे आहे. परिणामी संबंधित अटीतून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती अर्जात करण्यात आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी २७ जुलै २०१६ रोजी वारजूकर यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ (बलात्कार) अन्वये एफआयआर नोंदविला आहे. वारजूकर यांच्यातर्फे अॅड. श्रीरंग भांडारकर तर, शासनातर्फे अतिरिक्त अभियोक्ता संजय डोईफोडे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)