‘अवनी’च्या मादी बछडीला जंगलात सोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 09:43 PM2020-09-21T21:43:41+5:302020-09-21T21:45:01+5:30
पांढरकवडा येथे शूटरच्या माध्यमातून मारण्यात आलेलीे वाघीण ‘अवनी’ टी-१ च्या मादी बछडीला मूळ अधिवासात जंगलामध्ये सोडण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पांढरकवडा येथे शूटरच्या माध्यमातून मारण्यात आलेलीे वाघीण ‘अवनी’ टी-१ च्या मादी बछडीला मूळ अधिवासात जंगलामध्ये सोडण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) नवी दिल्ली यांच्याकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच सी-१ या मादी बछड्याला पावसाळ्यानंतर सुरक्षित वनक्षेत्रात सोडले जाणार आहे.
पांढरकवडा वनपरिक्षेत्रातील १३ गावकऱ्यांवर हल्ला करून ठार केल्याने टी-१ 'अवनी' या वाघिणीला गोळी घालून ठार मारण्यात आले होते. यामुळे या वाघिणीचे बछडे अनाथ झाले होते. या घटनेनंतर सुमारे एक वर्षाने अवनीची बछडी असलेली वाघीण सी-1 ला रेस्क्यू करून डिसेंबर-२०१८ मध्ये पेंचमधील चार हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या ओपनिंग क्लोजरमध्ये ठेवण्यात आले होते. वन कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली तिला शिकारीचे प्रशिक्षण देणे सुरू होते. मागील जुलै-२०१९ मध्ये तज्ज्ञांच्या झालेल्या बैठकीत या वाघिणीला तिच्या मूळ अधिवासात सोडण्याच्या विषयावर चर्चा झाली होती. मात्र एनटीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार काही त्रुटी दर्शविण्यात आल्या होत्या. त्यामुळे २०१९ मध्ये या वाघिणीला निसर्गमुक्त करण्यात आले नव्हते. परंतु नियमित प्रशिक्षणातून त्रुटी दूर झाल्याने आता तिला सुरक्षित अधिवासात सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ती आता स्वत:हून शिकार करण्यास सक्षम झाल्याचा अभिप्राय आला आहे. अलीकडेच ७ जुलैला झालेल्या तज्ज्ञांच्या बैठकीत या विषयावर एकमत झाले, यामुळे या मार्गातील अडथळे दूर झाले आहेत. आता पुढील प्रक्रियेसाठी एनटीसीएच्या परवानगीची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यासाठी एक प्रस्ताव तयार करून पाठविण्यात आला आहे.
आता नजरा एनटीसीएच्या मंजुरीकडे
वनविभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अवनी वाघिणीला शूटरकडून गोळी घालून ठार मारण्यात आल्याचा प्रसंग वनविभागाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. एचडी-१ ही अवनीची बछडी असल्याने तिला सुरक्षितपणे जंगलात सोडणे हे वनविभागासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच तिला निसर्गमुक्त केले जाणार आहे. यासाठी काळजीपूर्वक प्रस्ताव तयार करण्यात आला असून आता एनटीसीएच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.