समाजविघातक वर्तन टाळा; संघाचे आप्तस्वकीयांना खडे बोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 10:00 AM2018-03-10T10:00:35+5:302018-03-10T10:02:34+5:30
सामाजिक मुद्यांवर हिंसक वातावरण निर्माण होण्याच्या घटना मागील काही कालावधीत देशामध्ये दिसून आल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत अशा घटनांवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सामाजिक मुद्यांवर हिंसक वातावरण निर्माण होण्याच्या घटना मागील काही कालावधीत देशामध्ये दिसून आल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत अशा घटनांवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. समाजमनाला ठेच पोहोचविणारे किंवा त्यांच्या भावना दुखविणारे वर्तन टाळले पाहिजे, असे खडेबोल सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी संघ परिवारातील संघटनांना सुनावले आहेत. प्रामुख्याने त्यांचा रोख त्रिपुरा येथील लेनिन पुतळा वाद तसेच भाजपसह विविध संघटनांच्या नेत्यांकडून विविध मुद्यांवर वेळोवेळी येणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांवर होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला शुक्रवारपासून उपराजधानीत सुुरुवात झाली. सभेच्या सुरुवातीलाच सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी राष्ट्रीय पातळीवरील स्थितीवर भाष्य करत या मुद्यांवर आपली भूमिका मांडली. आपल्या समाजात आपापसातील संघर्ष व त्यातून होणाऱ्या हिंसक घटना ही चिंतेची बाब आहे. अशा घटनांमध्ये होणाऱ्या हिंसेमध्ये सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होते. ही निंदनीय बाब आहे. समाजमनाला दुखविणाऱ्या काही घटना समाजात घडतात. अशा घटनानंतर सामूहिक पद्धतीने संतप्त प्रतिक्रिया येते. परंतु कुठल्याही कारणाने, व्यवहाराने जनभावना दुखावल्या जाणार नाहीत व समाजाच्या सन्मानाला ठेच पोहोचणार नाही, याची काळजी विविध संंबंधित पक्ष व संघटनांनी घेतली पाहिजे. अशा प्रसंगी धार्मिक, सामाजिक व राजकीय नेतृत्वाने सकारात्मक पुढाकार घेतला पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादन केले.
न्याय व सुरक्षा व्यवस्थेवरील विश्वास टिकविण्याची गरज
सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांनी सार्वजनिकपणे न्यायपालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले होते. सोबतच देशाच्या सुरक्षा यंत्रणांवरदेखील ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून टीका झाली. या मुद्यावरदेखील सरकार्यवाहांनी भाष्य केले. न्यायव्यवस्था व सुरक्षाव्यवस्था यांच्यावर नागरिकांचा विश्वास आहे. या व्यवस्थांप्रति असलेला सन्मान व विश्वासाला धक्का लागणार नाही, यावर चिंतन व्हायला हवे. संविधानात प्रत्येकाला आपला पक्ष मांडण्याचा अधिकार आहे. परंतु तसे करताना मर्यादांचे पालन व्हायला हवे, असे ते म्हणाले.
समाजात द्वेषभावना पसरविणारे सक्रिय
यावेळी भय्याजी जोशी यांनी डाव्या विचारसरणीवरदेखील अप्रत्यक्षरीत्या टीका केली. गेल्या काही काळापासून देशात द्वेषभावना पसरविणारे तत्त्व सक्रिय झाले आहेत. सामाजिक वातावरण गढूळ करणाऱ्यांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. भूतकाळातून शिकवण घेऊन वर्तमानातील समस्यांवर सामोपचाराने तोडगा काढला गेला पाहिजे. विशेषत: समाजाला तोडण्याचे व द्वेषभावना पसरविण्याचे काम करणाऱ्यांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे, असे जोशी यांनी सभेला सांगितले.