सीताबर्डी, सदर, सक्करदरा, गोकुळपेठ, महालसह बाजारपेठेतील गर्दी टाळा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:07 AM2021-06-21T04:07:33+5:302021-06-21T04:07:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरातील कोरोना संक्रमण बरेचसे नियंत्रणात आले आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने बरेचसे निर्बंध हटविले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील कोरोना संक्रमण बरेचसे नियंत्रणात आले आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने बरेचसे निर्बंध हटविले आहे. सोमवारपासून नागपूर खऱ्या अर्थाने अनलॉक होत आहे. त्यामुळे सर्व बाजारपेठा उघडणार असून गर्दीही होईल. परंतु ही गर्दीच खऱ्या अर्थाने धाेकायदायक ठरण्याची शक्यता आहे. तेव्हा नागरिकांनो सीताबर्डी, महाल, सदर, सक्करदरा, गोकुळपेठ आदींसारखी बाजारपेठेतील गर्दीची ठिकाणे टाळावीत. सर्व बाजारपेठा खुल्या होत असताना आपण स्वैराचाराने वागलो, खबरदारी व जवाबदारीने वागलो नाही तर हीच गर्दीची ठिकाणे उद्या कोरोना वाढविणारे हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागपुरातील कोरोना संक्रमणाची परिस्थिती बरीचशी आटोक्यात आली आहे. नागपूर अजूनही पहिल्या श्रेणीमध्ये समाविष्ट आहे. तरीही जिल्हा व मनपा प्रशासन संयमाने परिस्थिती हाताळत आहे. कुठलीही घाई न करता हळूहळू निर्बंध शिथिल केले जात आहेत. मागील दोन आठवड्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे प्रशासनाने निर्बंधांमध्ये आणखी सवलत देत सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू असणारी सर्व दुकाने आता रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहतील तर रेस्टाॅरंट, बार रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोमवारपासून याची अंमलबजावणी होईल. परंतु आताच खऱ्या अर्थाने नागरिकांना जबाबदारीने वागण्याची आवश्यकता आहे. टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविलेली आहे. तसेच नागपुरातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरातील सीताबर्डी, महाल, सदर, सक्करदरा, गोकुळपेठ आदी बाजारपेठेतील ठिकाणेच खऱ्या अर्थाने हॉटस्पॉट ठरली होती, हे विसरून चालणार नाही. तेव्हा नागरिकांनो खबरदारी घ्या. आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या. गर्दीच्या ठिकाणी जाणे सध्यातरी टाळा.
२८ जूनला पुन्हा आढावा
प्रशासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. परंतु याबाबतचे आदेश केवळ एका आठवड्यापुरतेच देण्यात आले आहेत. २८ जूनला पुन्हा आढावा घेतला जाईल. तेव्हाच्या परिस्थितीनुसार निर्बंध आणखी शिथिल करायचे की कडक करायचे, याचा प्रशासन निर्णय घेईल. त्यामुळे ही शिथिलता कायमस्वरूपी राहावी, असे वाटत असेल तर सर्वांनीच अधिक खबरदारी घेत जबाबदारीने वागण्याची गरज आहे.