अति खाणे टाळा, घरचेच जेवण घ्या; जागतिक मेंदू दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 11:38 AM2019-07-23T11:38:55+5:302019-07-23T11:39:14+5:30

जेवल्यानंतर काही खाऊ नका. दुसऱ्या दिवशीचा ‘ब्रेकफास्ट’ उशिरा करा. ‘पॉलिअनसॅच्युरेटेड’ तेलाचा वापर बंद करा. नियमित व्यायामाला महत्त्व द्या, असा सल्ला वरिष्ठ मेंदू रोग तज्ज्ञ व ‘वर्ल्ड ट्रॉपिकल न्यूरॉलॉजी’चे डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिला.

Avoid overeating, take home meals; Celebrating World Brain Day | अति खाणे टाळा, घरचेच जेवण घ्या; जागतिक मेंदू दिवस साजरा

अति खाणे टाळा, घरचेच जेवण घ्या; जागतिक मेंदू दिवस साजरा

Next
ठळक मुद्देचंद्रशेखर मेश्राम यांचा सल्ला 

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाढते वजन ही आजच्या काळातील मोठी समस्या आहे. वजन कमी करणे अवघड जरूर आहे, पण अशक्य मात्र नाही. गरज आहे, ती वजन का वाढते आणि ते आटोक्यात कसे ठेवता येते, ते समजून घेण्याची. आहार व लठ्ठपणा यांचा मेंदूशी संबंध आहे. योग्य आहार घेतल्यास आणि ‘सेच्युरेटेड फॅट्स’ व ‘हाय कोलेस्ट्रॉल’ असणाऱ्या खाद्य पदार्थांचे सेवन कमी केल्यास याचा नक्कीच फायदा होतो. दिवसातून दोन किंवा तीन वेळा घरचेच जेवण करा. रात्रीचे जेवण लवकर करा. जेवल्यानंतर काही खाऊ नका. दुसऱ्या दिवशीचा ‘ब्रेकफास्ट’ उशिरा करा. यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. ‘पॉलिअनसॅच्युरेटेड’ तेलाचा वापर बंद करा. नियमित व्यायामाला महत्त्व द्या, असा सल्ला वरिष्ठ मेंदू रोग तज्ज्ञ व ‘वर्ल्ड ट्रॉपिकल न्यूरॉलॉजी’चे डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिला.
न्यूरो सोसायटी, ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशन आणि सायकॅट्रिक सोसायटी नागपूर यांच्यावतीने रविवारी जागतिक मेंदू दिवसानिमित्त आय. टी. पार्क येथील पर्सिस्टंटच्या कवी कुलगुरू कालिदास सभागृहात ‘कुठलेही डायटिंग न करता वजन कसे कमी करावे’, या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी जसलोक व लीलावती हॉस्पिटलचे डोकेदुखी रोग तज्ज्ञ डॉ. के. रविशंकर उपस्थित होते.
डॉ. मेश्राम म्हणाले, अति खाणं, दिवसभरात अनेकदा खाणं आणि ‘अनहेल्दी फूड’ खाणे हे लठ्ठपणाला कारणीभूत असलेले मुख्य कारण आहे. आपल्या आहारातून केकस्, कुकीज, बिस्कीट, मैद्याचे संपूर्ण पदार्थ, मायक्रोवेव्ह पॉपकॉर्न, पोटॅटो चिप्स, कुरकुरे, बिस्कीट, प्रोझन फूट, ब्रेड, मिठाई, कोल्डड्रिंक आदी ‘प्रोसेस फूड’ खाणे बंद केल्याने वजन कमी करण्यास मोठा फायदा होतो. उपवास केल्याने आणि दिवसातून केवळ दोन किंवा तीन वेळा जेवल्यानेही शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करता येऊ शकते. ‘पॉलिअनसॅच्युरेटेड’ तेल यात सूर्यमुखी, सोयाबीन आदी तेल खाणे बंद केल्यास लठ्ठपणा नियंत्रणात आणण्यास मदत होते. याच्या जोडीला रोजचा व्यायाम व दिवसभरात शारीरिक हालचाली वाढविल्यास लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते, असेही डॉ. मेश्राम म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक न्यूरो सोसायटीचे अध्यक्ष डॉ. श्याम बाभूळकर यांनी केले. संचालन प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुधीर भावे यांनी केले.
डोकेदुखीवर स्वत:हून औषधे घेणे टाळा-डॉ. रविशंकर
डॉ. के. रविशंकर यांनी डोके का दुखते आणि त्यावरील उपचार याची माहिती दिली. ते म्हणाले, अनेकजण डोकेदुखी करता डोळ्याचे डॉक्टर, ‘ईएनटी’चे डॉक्टर तर काही हाडाचे डॉक्टरांकडे जातात. परंतु डोकेदुखीचे महत्त्वाचे कारण ‘मायग्रेन’ म्हणजे अर्धशिशी हे आहे. मायग्रेनमध्ये ४० टक्के लोकांना डोक्याच्या एका बाजूला तर इतर लोकांना डोक्याच्या दोन्ही भागाला दुखते. डोकेदुखीवर स्वत:हून औषधे घेण्याचा प्रकार धोकादायक होऊ शकतो. रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मायग्रेन १५ ते ५० वयोगटात होते आणि नंतर त्याचे प्रमाण कमी होत जाते. ‘मायग्रेन’वर उपचार व औषधे उपलब्ध आहेत. नुकतीच बाजारात नवी लस आली आहे, परंतु तिची किमत फार जास्त आहे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली.
हृदयस्पर्शी ‘ब्युटीफूल मार्इंड’
या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘ब्युटीफूल मार्इंड’ या चित्रपटाचे खास सादरीकरण करण्यात आले. मानवी भावना, गुणधर्म आणि जागतिकीकरणाच्या आंतरसंबंधामधील विधान करणारा हा चित्रपट हृदयस्पर्शी ठरला. अर्थशास्त्रातील योगदानाबद्दल नोबेल पुरस्काराने सन्मानित प्रा. जॉन फॉर्ब्स नॅश यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात रसेल क्रो या अभिनेत्याने नॅश यांना होणारे ‘हॅल्युसलेशन’ (आभासी विश्व) सुरेखरीत्या साकारले आहे.

Web Title: Avoid overeating, take home meals; Celebrating World Brain Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य