गहू-तांदूळ सोडा.. भरड धान्याचे सेवन करा; लठ्ठपणा व मधुमेहावर गुणकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2023 08:08 PM2023-02-18T20:08:45+5:302023-02-18T20:09:07+5:30
Nagpur News आता आपल्या आहाराकडे लक्ष देण्याची, तांदूळ व गव्हाच्या जागी भरड धान्यांचे सेवन करण्याची वेळ आली आहे.
नागपूरः जुन्या काळात ‘मिलेट्स’ म्हणजे भरड धान्य हे आपल्या आहाराचा अविभाज्य भाग होता; परंतु मागील काही वर्षांपासून अनेकांना याचा विसर पडला. परिणामी, अयोग्य आहारामुळे लठ्ठपणा व मधुमेहासारखे विकार वाढले आहेत. आता आपल्या आहाराकडे लक्ष देण्याची, तांदूळ व गव्हाच्या जागी भरड धान्यांचे सेवन करण्याची वेळ आली आहे.
-हे वर्ष ‘मिलेट्स’साठी महत्त्वाचे का ?
संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्या प्रस्तावानंतर २०२३ हे वर्ष ‘इंटरनॅशनल ईयर ऑफ मिलेट्स’च्या रुपाने नियुक्त करण्यात आले आहे.
-भरड धान्याचा इतिहास ?
भारत आणि आफ्रिकेत गेल्या पाच हजार वर्षांपासून भरड धान्य खाल्ली जात आहेत. हरितक्रांतीच्या काळात त्यांची जागा तांदूळ आणि गव्हाने घेतली. भारत आणि आफ्रिकेतील उष्ण कोरड्या हवामानात भरड धान्य सहज उगवतात आणि कमी पाणी आणि कमी सुपीकता असलेल्या जमिनीत ते पिकवता येते.
-भरड धान्याचे किती प्रकार उपलब्ध आहेत ?
नाचणी, ज्वारी, बाजरी या भरडधान्यांवर कापणीनंतर यावर प्रक्रिया करण्याची गरज पडत नाही. ते कापणीनंतर लगेच वापरले जाऊ शकतात. फॉक्सटेल बाजरी (कांगणी), ‘लिटल मिलेट्स’ आणि ‘कोदो मिलेट्स’ यांसारख्या धान्यांवर अपचनीय आवरण असते. वापरण्यापूर्वी ते काढून टाकणे आवश्यक असते.
-वजन कमी करण्यास भरड धान्य मदत करते का ?
भरड धान्यांमध्ये कमी कॅलरी असते. आहारात याचा समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. विशेष म्हणजे, हे दिवसभर ऊर्जेची पातळी चांगली ठेवण्यास मदतही करते. ते ‘स्नॅकिंग’ आणि जास्त खाण्याला प्रतिबंधितही करते.
- भरड धान्य मधुमेहास कशी मदत करते ?
गहू आणि तांदळाच्या तुलनेत भरड धान्यांमध्ये ‘ग्लायसेमिक इंडेक्स’ कमी असतो. यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी चांगले असते.
- भरड पचनास कशी मदत करते ?
भरडमध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे ते पचनाच्या बहुतांश तक्रारी दूर करतात.
- भरडमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात का ?
भरड धान्यांमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म राहत असल्याने शरीर ‘डिटॉक्स’ करण्यास मदत होते. विशेषत: ‘क्वेरसेटिन’, ‘करक्यूमिन’, ‘ॲलाजिक ॲसिड’ आणि अन्य अवयव शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकत असल्याने धोकादायक ‘ऑक्सिडंट्स’ निष्प्रभ करतात.
-‘मिलेट्स’ हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीला कशी निरोगी ठेवते?
‘मिलेट्स’मध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, लोह, जस्त आणि काही अत्यावश्यक स्निग्धांश असतात जे निरोगी रक्तदाब राखण्यास आणि रक्तवाहिन्यांचे अभिसरण सुलभ करण्यास मदत करतात.
-‘मिलेट्स’मध्ये ग्लुटेनची स्थिती काय आहे?
‘मिलेट्स’ हे ग्लुटेन मुक्त आहे. ग्लुटेन-संबंधित अतिसार आणि ग्लुटेन ॲलर्जीशी संबंधित इतर पाचन समस्यांनी ग्रस्त लोकांसाठी हे एक आदर्श धान्य आहे.