नागपुरातून गेलेल्या नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:07 AM2021-01-15T04:07:56+5:302021-01-15T04:07:56+5:30
नागपूर : नागपुरातून परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठविलेल्या कोंबड्यांच्या आणि अन्य पक्ष्यांच्या नमुन्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही. या अहवालाची पशुसंवर्धन विभागाला ...
नागपूर : नागपुरातून परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठविलेल्या कोंबड्यांच्या आणि अन्य पक्ष्यांच्या नमुन्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही. या अहवालाची पशुसंवर्धन विभागाला प्रतीक्षा असून त्यानंतरच पुढील उपाययोजना केल्या जाणार आहेत.
नागपुरात प्रारंभी हे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्याचे ठरले होते. मात्र तेथील प्रयोगशाळेवर कामाचा अतिरिक्त ताण असल्याने नंतर पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्याचे ठरले. तीन दिवसांपूर्वी नमुने पाठविण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसात त्याचा अहवाल येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्याचा आढावा घेण्यासाठी आयुक्त स्तरावर वॉर रूम स्थापन करण्यात आली असून त्या माध्यमातून रोज सायंकाळी आढावा घेतला जात आहे. राज्यात बर्ड फ्लूचा उद्रेक होऊ नये या दृष्टीने सूचनाही दिल्या जात आहे. नागपूर विभागातील परिस्थिती संदर्भात विचारणा केली असता विभागाचे पशुसंवर्धन सहआयुक्त किशोर कुंभरे म्हणाले, विभागामध्ये कर्मचाऱ्यांची आरआरटी पथके तयार करण्यात आली असून सर्वांना प्रशिक्षणही दिले आहे. पशुसंवर्धन सहआयुक्त (रोग अन्वेषण विभाग) यांच्या सूचनेनुसार, शेतकरी आणि व्यावसायिक पक्षीपालकांना स्वच्छतेसंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.
...
केळापुरात ६०० कोंबड्यांचा मृत्यू
केळापूर (जि. यवतमाळ) येथील एका खाजगी पोल्ट्री फार्ममधील ६०० कोंबड्यांचा मृत्यू झाला. या फार्ममध्ये १,७०० कोंबड्या आहेत. जीवंत असलेल्या कोंबड्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर, भंडारा जिल्ह्यातील पालंदूर येथील फार्म हाऊसमधील कोंबड्यांच्या मृत्यूतही वाढ झाली आहे. आधी येथे २४ कोंबड्यांचा मृत्यू झाला होता, ही संख्या आता ५५ वर पोहचली आहे. या फार्म हाऊसमध्ये ३०० कोंबड्या होत्या.
...
प्रयोगशाळेतून आलेला कोंबड्यांच्या मृत्यूचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या मारण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाऊ शकते. पालंदूर आणि केळापूर या दोन ठिकाणी या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
- किशोर कुंभरे, पशुसंवर्धन सहआयुक्त, नागपूर