आकर्षक मनोरंजन पार्कसह चौपाटीला हस्तांतराची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:08 AM2021-05-14T04:08:59+5:302021-05-14T04:08:59+5:30
दिनकर ठवळे कोराडी: पर्यटन विकासाचा एक भाग म्हणून कोराडी येथील तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. तलावाच्या कडेला विसर्जन कुंड ...
दिनकर ठवळे
कोराडी: पर्यटन विकासाचा एक भाग म्हणून कोराडी येथील तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. तलावाच्या कडेला विसर्जन कुंड व मनोरंजन पार्क तयार करण्यात आले आहेत. विसर्जन कुंड व मनोरंजन पार्कचे काम पूर्ण झाले असून, या पार्कला आता कोराडी ग्रामपंचायतीच्या हस्तांतरणाची प्रतीक्षा आहे. हे हस्तांतरण झाल्यावर कोराडी, महादुला, नांदा, लोणखैरी येथील आबालवृद्धांना याठिकाणी उत्तम आरोग्यासाठी मनोरंजनाच्या माध्यमातून संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता या पार्कच्या हस्तांतरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महानिर्मितीच्या निधीतून कोट्यवधींचे हे काम नागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. विशेष म्हणजे नागपूर महानगर विकास प्राधिकरणाने चार महिन्यांपूर्वीच हे काम पूर्ण झाले असून, संबंधितांकडे हस्तांतरण करावे, अशी विनंती महानिर्मिती (प्रकल्प) ला केली आहे. महानिर्मिती (प्रकल्प) च्या अधिकाऱ्यांनी हा विसर्जन कुंड व मनोरंजन पार्क आपल्या ताब्यात द्यावा, अशी विनंती करणारे पत्र मार्च महिन्यातच कोराडी ग्रामपंचायतीला दिले आहे. अजूनही याबाबत हस्तांतरण करून घेण्याची प्रक्रिया ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू करण्यात आली नाही. ग्रामपंचायतीचे सर्व लक्ष कोविड नियंत्रणावर असून, त्यामुळेच या हस्तांतरणाला विलंब होत असल्याची माहिती आहे.
कोराडी येथील वीज केंद्राच्या संग्रहण तलावात कोराडी, महादुला, खापरखेडा, सावनेर, कामठी, नागपूर आदी भागांतून मोठ्या प्रमाणात गणपती व दुर्गा विसर्जन केले जाते. त्यामुळे या विसर्जनातून निर्माल्य व पाणी प्रदूषणाच्या समस्या निर्माण होतात. त्यासाठी महानिर्मितीच्या वतीने या तलावाच्या नांदा कोराडी दिशेने विसर्जन कुंड व मनोरंजन पार्क तयार करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे या कामाला आधीच विलंब झाला. आता काम पूर्ण झाल्यावर हस्तांतरणाला विलंब होत आहे. या ठिकाणी ४०० मीटर लांब, ११ मीटर रुंद व ५ मीटर खोल, असे भव्य विसर्जन कुंड तयार करण्यात आले आहे.
कोविड संसर्गाचा विचार करता मनोरंजन पार्क खुला केल्यानंतर संभाव्य गर्दी नियंत्रित करताना अडचणी येतील. त्यामुळे परिस्थिती सर्वसाधारण झाल्यावरच हा मनोरंजन पार्क सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती सरपंच नरेंद्र धानोरले व उपसरपंच आशिष राऊत यांनी दिली.