जागृत नागपूरकर घेत आहेत खबरदारी : औषधी दुकानात सोशल डिस्टन्सिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 11:58 PM2020-03-27T23:58:52+5:302020-03-27T23:59:32+5:30
नागपूरकरांमध्ये संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तुंसाठी बाहेर पडण्याची परवानगी आहे. जागरूक नागरिकांतर्फे सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन घोषित केल्याने लोक घरात बंद आहेत. नागपूरकरांमध्ये संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तुंसाठी बाहेर पडण्याची परवानगी आहे. मात्र विषाणूवर कुठलेही औषध उपलब्ध झाले नसल्याने धास्ती आणखी वाढली आहे. त्यामुळे भीतीपोटी आणि जबाबदारीनेही या विषाणूची बाधाच होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. जागरूक नागरिकांतर्फे सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे.
शहरात दूध, भाज्या, किराणा, औषधी आदी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडण्याची मुभा आहे. त्यामुळे गोंधळ उडण्यासारखी परिस्थिती नाही. पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेनंतर थोडी धावपळ उडाली होती. मात्र जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणात फरक पडणार नाही या राज्य शासनाच्या घोषणेनंतर थोडा दिलासा मिळाला. मात्र या वस्तू खरेदी करतानाही मोठी खबरदारी घेतली जात आहे. जागरूक नागरिक घराबाहेर पडताना सॅनिटायझरचा वापर करीत आहेत. वस्तू खरेदी करतानादेखील खबरदारी घेत सॅनिटायझरचा वापर केला जात आहे. खरेदी करून घरी आल्यानंतर घरात प्रवेश करण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुण्याची प्रॅक्टीस लोक करीत आहेत. दिवसभर मोबाईल, टीव्हीच्या माध्यमातून किंवा कुटुंबाशी संवादाच्या माध्यमातून मनोरंजन केले जात आहे. दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्यांकडूनही खबरदारी घेतली जात आहे. शहरातील चौकातील किराणा दुकानदार, औषधी दुकानदार आणि सुपरशॉपमध्ये काळजी घेतली जाताना दिसून आली. सुपर शॉपीमध्ये नागरिकांच्या शरीराचे तापमान तपासणे, हातावर सॅनिटायझर दिले जात आहे. एकापेक्षा अधिक व्यक्तींना दुकानात येण्यास मनाई केली जात आहे. किराणा दुकानातही बाहेर गोल मार्क करून उभे केले जात आहे. ग्राहक जवळजवळ उभे राहू नयेत याची सूचना केली जात आहे. ही व्यवस्था औषधी दुकानातही दिसून येत आहे. ग्राहकांना सॅनिटायझर दिले जात आहे. त्यांना दूर उभे ठेवले जात आहे आणि एकएक करून बोलावले आणि औषधे तसेच किरणा दिला जात आहे. नागरिकही या व्यवस्थेचे पालन करीत आहेत.
शॉपीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सॅनिटायझर
वस्तूंना वेगवेगळ्या लोकांचा हात लागत असल्याने सॅनिटायझर लावण्याच्या व हात धुण्याच्या सूचना आधी देतो. आतमध्ये गर्दी होणार नाही इतकेच लोक सोडले जात आहेत. संपूर्ण तपासणी केल्याशिवाय व ही व्यक्ती आजारी नाही ना याची खात्री केली जात आहे. यामुळे जनजागृती होऊन कोरोना होण्यापासूनदेखील बचाव होईल.
विक्की चोरडिया, सुपरशॉपी चालक.
विशेष काळजी घेतो
एकतर गरज नसेल तर बाहेर पडत नाही. दूध किंवा भाजीची गरज पडेल तेव्हाच बाहेर पडते. मात्र सोबत सॅनिटायझर असतो. खरेदी करण्यापूर्वी व खरेदी केल्यानंतरदेखील हाताला सॅनिटायझर लावतो. घरी आल्यानंतर आधी हातपाय धुऊन नंतरच घरात प्रवेश करतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेतली जात आहे. दिवसभर मोबाईल, टीव्ही किंवा कुटुंबाशी संवाद साधत वेळ जात आहे. वाचायला काही पुस्तकेसुद्धा आणली आहेत.
मोनाली भोईटे, नागरिक
दूर उभे ठेवूनच औषधींचे वितरण
दुकानांमध्ये विशेष काळजी घेतली आहे. काऊंटरच्या जवळ येऊन हात लावू नये म्हणून थोड्या अंतरावर रस्सी बांधली आहे. एकएक मीटरच्या अंतरावर गोल केले केले आहेत व ग्राहकांना त्याच गोलवर उभे करण्यात येते. एकएका व्यक्तीला रस्सीपर्यंत बोलावून औषधी देतो. त्यांना सॅनिटायझरही देतो. बाहेर अंतर ठेवा, गर्दी करू नका असा बोर्डच लावला आहे.
धरमदास पडोळे, औषधी विक्रेता.
रुमाल बांधूनच खरेदी
मी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहेर आलो होतो. सामान खरेदी करण्यापूर्वीच बाहेर हातावर सॅनिटायझर लावण्यात आले. तसेच रुमाल बांधूनच खरेदी केली असून, घरी गेल्यावरही बाहेरच हात धुण्याची व्यवस्था केली आहे.
आरती नाईक, नागरिक.
आम्ही घरूनच पौष्टिक आहाराची विक्री करतो. बाळंतीण व तीन वर्षापर्यंत नवजात बाळासाठी लागणाऱ्या पौष्टिक खाद्यपदार्थांचा त्यात समावेश आहे. लॉकडाऊन झाल्यापासून विक्री बंद ठेवली आहे. हा आहार बनविणाऱ्या महिलेसही सुटी दिली आहे. आता ज्यांना अधिकच गरज असेल अशाच दाम्पत्याला हा आहार देतो आणि हे सर्व मी स्वत: घरी तयार करते. विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही, यासाठी विशेष काळजी घेत आहोत.
आराधना ताठे, पौष्टिक आहार वितरक